किशोरवयातील मुलींचे प्रश्न समजून घेतले पाहिजे – सुषमा आकुसकर
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : जयप्रभा माध्यमिक विद्यालय कुंबेफळ येथे सावित्री फुले यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी ( दि. ५ ) मानवलोक समाजकार्य महाविद्यालय अंबाजोगाई येथील आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभाग तसेच क्षेत्रकार्याच्यावतीने किशोरवयीन मुलींचा मेळावा आयोजित करण्यात आल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बन्सी पवार, प्रमुख मार्गदर्शक सौ. सुषमा शिवरूद्र आकुसकर, प्रमुख पाहुणे डॉ. हनुमंत साळुंके उपस्थित होते.
यावेळी डॉ.हनुमंत साळुंके यांनी मुलींना त्यांच्यात होणाऱ्या शारीरिक बदलांविषयी तसेच किशोर वयात निर्माण होणाऱ्या मानसिक समस्या या विषयी मार्गदर्शन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासंबंधीची भूमिका प्रस्ताविकातून व्यक्त केली तसेच मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी असे कार्यक्रम सतत आयोजित करण्याचे मानस व्यक्त केला .
प्रमुख मार्गदर्शिका सौ. सुषमा आकुसकर यांनी किशोरवयीन मुलींना नैसर्गिकरित्या होणाऱ्या शारीरिक बदलांचा स्वीकार करण्यास सांगितले. मुलींना मार्गदर्शन करताना सोप्या पद्धतीत त्यांच्या अडचणी जाणून घेत प्रश्न उत्तर करत त्यांना किशोर वयात होणारे बदल यांना स्वीकारून सामोरे कसे जावे, त्याच बरोबर किशोर वयातील शरारिक, मानसिक बदलांविषयी माहिती दिली . आपले कुटुंब व समाजाविषयीची भावना , स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन या काळात स्वतःला कमी न लेखता किशोरवय ही नैसर्गिक देणगी समजून तिचा आनंदाने स्वीकार करण्याचे आवाहन केले . त्याच बरोबर प्रत्येक तरुणीने स्वतःला या वयात सावरून भवितव्य कसे घडवायचे याकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक बन्सी पवार यांनी शाळेतील मुलींना आरोग्य विषयक व इतर सेवा सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत असल्याबद्दल मत व्यक्त केले. तसेच येत्या काळात मुलींसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी आठवी ते दहावी वर्गातील 6o विद्यार्थिनी उपस्थित होत्या तसेच शाळेतील शिक्षक व क्षेत्रकार्याचे विद्यार्थी अश्विनी जमाले , रुपाली नक्कलवार , अर्जुन देशमुख , ज्ञानेश्वर राठोड , अनिकेत पाटील , हनुमंत साखरे , राजेश राजले आणि आकाश तौर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी जमाले तर आभार अर्जुन देशमुख यांनी मानले.