काहीतरी अजबच! पतीच्या तक्रारीवरून पत्नी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल
लोकगर्जनान्यूज
धारुर : एकाच घरात रहात असलेल्या पती-पत्नी मध्ये बिनसलं अन् अजबच प्रकार समोर आला. पतीने पत्नीने घरातील संसारोपयोगी साहित्य तसेच फरशी,पत्र आदी चोरुन नेल्याची तक्रार केली. यावरुन धारुर पोलीस ठाण्यात पत्नीसह काहींवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या अजब प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील धारुर पोलीस ठाणे हद्दीतील केंद्रेवाडी येथील हे वाघमारे दांपत्य आहे. सदाशिव दौलतराव वाघमारे ( वय ५२ वर्ष ) रा. केंद्रेवाडी यांनी पत्नीने ( दि. १२ ) फेब्रुवारी दुपारी घरातील फरशी, कपडे, टिव्ही, सोन्याचे दागिने,पत्रे आदिसह संसारोपयोगी साहित्य एकूण २ लाख ७३ हजार १०० रुपयांचे साहित्य चोरुन नेल्याची तक्रार केली. पतीनेच पत्नीच्या विरोधात चोरीची तक्रार केल्याने प्रथम पोलीसही चक्रावून गेले. परंतु या तक्रारीवरुन ( दि. २३ ) अखेर आरोपी पत्नी सविता सदाशिव वाघमारे रा. केंद्रेवाडी ( ता. अंबाजोगाई ), गोरखनाथ रामचंद्र तरकसे, दादाराव अच्युत मिसाळ रा. धावडी, सिध्देश्वर अभिमान केंद्रे यांच्यावर धारुर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पती च्या तक्रारीवरून पत्नीवर चोरीचा गुन्हा हा अजबच प्रकार समोर आल्याने या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. घटनेचा अधिक तपास पो. उपनिरीक्षक गोविंद बास्टे हे करीत आहेत.