कार-दुचाकीचा अपघात; एक गंभीर जखमी आडस-अंबाजोगाई रस्त्यावरील रात्रीची घटना

आडस : पांगरी येथून अंबाजोगाई कडे जाताना मुलीचा फोन आल्यामुळे रस्त्याच्या कडेला थांबून बोलताना पाठीमागून आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आडस येथील पेट्रोल पंपासमोर रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमीवर अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महावितरण कंपनीमध्ये वरिष्ठ यंत्र चालक म्हणून बोरीसावरगाव येथे कार्यरत असलेले हनुमंत अहंकार हे अंबाजोगाई येथे रहातात तर पांगरी ( ता. धारुर ) येथे त्यांची जमीन असून ते रविवारी ( दि. २७ ) पांगरी येथून अंबाजोगाई कडे दुचाकी क्र. एम.एच. ४४ व्ही ४२७८ वर जाताना दरम्यान आडस येथील अंबाजोगाई रस्त्यावरील पेट्रोल पंप जवळ अहंकारे यांना त्यांच्या मुलीचा फोन आला. फोन आल्यामुळे त्यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी करुन फोन वर बोलताना अंबाजोगाईच्या दिशेने चाललेली स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम.एच. २४ एक एस ०९९७ चालकाचा अचानक कारवरील ताबा सुटल्याने ती सरळ अहंकारे यांच्या दुचाकीवर जाऊन जोरात धडकली. यामध्ये हनुमंत अहंकारे यांना डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी आहेत. हे महावितरण कंपनी असल्याचे समजताच घटनास्थळी उपस्थितापैकी एकाने येथील महावितरणचे कर्मचारी सुदर्शन काळे यांना फोन केला. काळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.