कार दरीत कोसळली जि.प. शिक्षक ठार पत्नी गंभीर जखमी
चुलत सासऱ्यांच्या अंत्यविधीसाठी जाताना काळानं गाठलं

लोकगर्जनान्यूज
आष्टी : गेवराई तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पत्नीसह चुलत सासऱ्यांच्या अंत्यविधीसाठी कडा ( ता. आष्टी ) कडे जाताना अज्ञात वाहनाने कट मारल्याने कार वरील ताबा सुटल्याने कार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात शिक्षक ठार तर त्यांची पत्नी गंभीर झाल्याची घटना आज सोमवारी ( दि. ६ ) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बीडसांगवी ( ता. आष्टी ) येथील घटात घडली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून अपघाताची माहिती मिळताच जि.प. सदस्य, सरपंच सह आदींनी मदत केली. बांधकाम विभागाच्या चुकीमुळे येथे नेहमीच अपघात घडत असल्याचं बोललं जातं आहे.
अंबादास पांडुरंग उगले ( वय ४६ वर्ष ) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. ते गेवराई तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. चुलत सासऱ्यांचं निधन झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ते पत्नी सह कार क्र. MH 23 AD 0249 ने गेवराई येथून कडा येथे चालले होते. दरम्यान बीडसांगवी जवळील घाटात ते आले असता एका अज्ञात वाहनाने कट मारल्याने ताबा सुटून महादेव दरा म्हणून ओळखले जाणाऱ्या खोल दरीत कार कोसळल्याने घडलेल्या अपघातात अंबादास उगले यांना गंभीर मार लागला व त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी सगुणा अंबादास उगले ( वय ४० वर्ष ) या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच माऊली जरांगे ( मा.जि.प. सदस्य ), नंदकिशोर करांडे ( सरपंच, बीडसांगवी ) यांच्यासह आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मदत करत जखमी सगुणा अंबादास उगले यांना बाहेर काढून उपचारासाठी कडा येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. घटाचा रस्ता असूनही येथील काही अंतराचे काम झालेले नाही. यामुळे नेहमीच अपघात घडत असून याला सर्वस्वी बांधकाम विभाग कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.