काय म्हणता? जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली
परंपरे प्रमाणे सोन्याची अंगठी अन् कपड्यांच्या अहेर देऊन केला सन्मान

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील विडा येथे परंपरे नुसार वाजतगाजत,डिजेच्या तालावर गाढवावर बसवून जावयाची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेली मिरवणूक दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संपली. मंदिरावर मिरवणूक गेल्यानंतर सासऱ्याकडू जावयाला भरपेहराव व सोन्याची अंगठी देऊन सन्मान करण्यात आला.
विडा येथे थट्टा मस्करीत गाढवावर बसवून जावयाची 90 वर्षांपूर्वी मिरवणूक काढण्यात आली. ही घटनाच या गावाची परंपरा बनली आहे. निजाम काळा पासून जावयाला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा विडा हे गाव जपत आहे. प्रत्येक वर्षी धुळवड ( धुलीवंदन ) दिनी ही मिरवणूक काढण्यात येते. प्रत्येक वर्षी नवीन जावायाला हा गाढव सवारीचा मान असतो. यावर्षी युवराज पटाईत यांचे जावई अविनाश करपे रा. जवळबन ( ता. केज ) हे होते. रात्री दोन वाजता अविनाश झोपेत असतानाच मेव्हण्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. आज मंगळवारी ( दि. 7 ) सकाळी गाढवावर बसवून वाजतगाजत ग्रामपंचायत कार्यालयापासून मिरवणूक सुरू झाली. पुर्ण गावातून मिरवणूक हनुमान मंदिरावर गेली. जावई अविनाश करपे यांना कपडे, सोन्याची अंगठीचा सासरे युवराज पटाईत यांनी आहेर देऊन सन्मान केला. यावेळी गावातील तरुणाई उत्साहात होती तसे विडा व परिसरातील गावांसह जिल्हाभरातील नागरिक ही मिरवणूक पाहण्यासाठी उपस्थित होते.