काय..ते.. धारुर आगार….कायती गळकी…बस.. कायबी ओके नाही बघा..?
पावसाळ्यात प्रवास करताना काय आता रेनकोट घालावे का?
लोकगर्जना न्यूज
बीड : बुधवारी ( दि. १३ ) धारुर येथे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस जागोजागी गळत होती. त्यामुळे सीट रिकामे आणि प्रवासी उभे असे चित्र निर्माण झाले. एकाही सीटवर बसता येत नसल्याने प्रवाशांना उभं राहून प्रवास करावा लागला. त्यामुळे काय …ते …. धारुर.. आगार…काय त्यांची …बस… कायबी ओके नाही बघा..अशी प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत होते. तर टिकिट वाढवायला पुढे अन् सेवा देण्यात मागे अशीही चर्चा सुरू आहे.
धारुर आगाराला अनेक समस्यांनी घेरले असून बसस्थानक परिसरात चिखल, कोलमडलेले वेळापत्रक, तुटलेली सीट, स्वच्छतेचा अभाव यासह आता पावसाळ्यात गळती लागलेल्या बस असे एक ना अनेक समस्या आहेत. बुधवारी ( दि. १३ ) धारुर आगाराची बीड-धारुर ही ४:३० वाजता बसस्थानकातून सुटलेली एम.एच. २० बी एल ००६७ ही बस पुर्ण गळत होती. समोरील चार -पाच सीट सोडले तर एकही सीट कोरडे नव्हते. त्यामुळे प्रवाशांना बीड ते धारुर उभं राहून प्रवास करावा लागला. उभे असतानाही कुठुन ही पाणी गळत होते. त्यापासून बचाव करावा लागला. काही प्रावासी हात ठेवण्यासाठी असलेल्या स्टॅण्डवर बसून होते. या गळती लागलेल्या बसचा सर्वाधिक त्रास वृद्ध, मुलं व महिलांना होत आहे. टिकिट वाढविण्याची एकही संधी न सोडणारे राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या गैरसोयीकडे लक्ष देईल का? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. मागील काही वर्षांपासून एसटीचे कर्मचारी त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आंदोलन करत असून, या आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते, मग तीच जनता पैसे मोजून एसटीने प्रवास करते त्यांच्या अडचणी कडे लक्ष देतील का? अशी अपेक्षा ही सामान्य प्रवासी व्यक्त करत आहेत. एसटीने प्रवास करताना आता काय? रेनकोट घालून प्रवास करावा का? असा प्रश्न प्रवासी विचारत असून धारुर आगार प्रमुख याचं उत्तर देतील का? याकडे लक्ष आहे.