कायम जमिनीवर पाय ठेवून काम करतो – न्यायमूर्ती संभाजीराव शिंदे
होळमध्ये ग्रामस्थांच्यावतीने सत्कार
केज : जरी गावातून बाहेर गेलो, तरी परत याच मातीत यायचं आहे, हे कायम मनात असते. कितीही सर्वोच्च पदावर गेलो, बंधने असली तरी आई-वडिलांचे संस्कार विसरलेलो नाही. कायम जमिनीवर पाय ठेवून काम करतो, असे प्रतिपादन राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संभाजीराव शिंदे यांनी केले.
नुकतीच त्यांची मुख्य न्यायमूर्तीपदी निवड झाली असून त्यांच्या जन्मगावी होळ (ता.केज) येथे ग्रामस्थांच्यावतीने रविवारी (दि.२४) जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबासाखर सहकारी करखान्याचे माजी चेअरमन दगडूजी शिंदे हे होते. व्यासपीठावर जेष्ठ नागरिक रघुनाथ शिंदे, सरपंच लक्षण राख, हृदयरोग तज्ञ डॉ.नवनाथ घुगे हे उपस्थित होते. पुढे बोलताना संभाजीराव शिंदे म्हणाले, माझा शपथविधी झाल्यानंतर अनेक ठिकाणी सत्कार, सलामी झाल्या. परंतु माझे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण ज्या शाळेत झाले, त्याठिकाणी माझा सत्कार होणे माझे भाग्य समजतो. माझे कितीही मोठे सत्कारसोहळे झाले तरी ग्रामस्थांच्या सत्काराची तुलना त्यासोबत होऊ शकत नाही. गावाकडे अनेकांना शासकीय सेवा करण्याची संधी मिळते, उर्वरित लोक सहसा शेती, व्यवसाय करतात. परंतु ते लहान आहेत व मी मोठा हे मी कधीही मानत नाही. जन्मताच आपण समान आहोत, या तत्त्वावर माझी श्रद्धा आहे. माझे लग्न झाल्यानंतर गावात जिथे-जिथे आमंत्रित केले होते, त्या ठिकाणी मध्यरात्री झाली तरी जाऊन आलो माझ्या गावातील प्रत्येक कुटुंबावर माझं प्रेम आहे. माझ्यावर अनेक संकटे, दुःखाचे डोंगर कोसळले, त्यावेळी मी खचलो नाही. एकदा पुढे गेलो की मागे कधी वळून पाहिले नाही. माझ्या यशाच्या प्रत्येक टप्प्यावर ग्रामस्थांची साथ आणि आशीर्वाद लाभले. गाव सोडून विदेशापर्यंत झेप घेता आली. न्यायचा वसा घेऊन काम करत असताना माझी पत्नी जरी समोर असली तरी कायद्याप्रमाणेच न्याय करेल, हे तत्व मी नेहमी पाळले. आजच्या आदरतिथ्याने भारावून गेलो असून जीवनाचे सार्थक झाले. ग्रामस्थांशी कायम स्नेह रहावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी भाजप नेते रमेश आडसकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, तहसीलदार दुलाजी मेंढके, सहायक पोलीस निरीक्षक डॉ.संदीप दहिफळे, माजी उपसभापती लक्ष्मीकांत लाड, नेताजी शिंदे आदींची उपस्थिती होती. ग्रामस्थांसह विविध शासकीय विभागांच्यावतीने संभाजीराव शिंदे व त्यांच्या पत्नी उमादेवी शिंदे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच लक्ष्मण राख यांनी केले. सूत्रसंचलन धनंजय शिंदे यांनी केले. तर रमाकांत सरवदे यांनी आभार मानले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.