कापूस भाव ७ हजार; ठेवावा की,विकावा शेतकरी चिंतेत
खर्च वाढला अन् भाव पडल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत
लोकगर्जनान्यूज
बीड दि.११(प्रतिनिधी) : बाजारात सध्या कापसाला सर्वसाधारण ७ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. वाढलेला खर्च यामुळे या भावाने कापूस विकणं शेतकऱ्यांना परवडत नाही. ठेवावा तर २२ लाख गाठी आयात केल्या आहेत तर ११ लाख गाठी सीसीआयकडे पडून आहेत. त्यांनीही लिलाव सुरू केला तर भाववाढीची आशा धूसर दिसत आहे. यामुळे कापूस विकावा की, ठेवावा या दुहेरी संकाटात कापूस उत्पादक शेतकरी अडकल्याचे चित्र असून, या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता कोण धावून येणारे याची प्रतिक्षा आहे.
कापूस हे कोरड वाहू शेतकऱ्यांचे नगदी पीक यामुळे यास पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. पण हे पांढरे सोने अस्मानी अन् सुल्तानी अशा दोन्ही संकटात सापडले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी फुटलेल्या कापसाच्या वाती अन् बोंडे नासून गेली आहेत. यामुळे एकाच वेचणीत कापसाची पळाटी होत आहे. तरीही शेतकरी भाव चांगला मिळेल अन् हे नुकसान भरुन निघेल म्हणून तग धरुन होता पण सुलतानी संकटाने गाठलेच, भारताच्या गाठी पेक्षा विदेशातील कापूस गाठींचे दर कमी होते. सहा महिन्यांपूर्वी भारताच्या कापूस गाठींचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात ६० हजार ५०० रुपये खंडी इतके होते. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व ब्राझील या देशांच्या कापसाच्या गाठींचे दर ५३ ते ५४ हजार रुपये खंडी इतके होते. त्यामुळे स्थानिक बाजारातील सूत गिरणी चालक व कॉटन बाजारातील अनेक व्यावसायिकांनी कमी दरात असलेल्या कापसाच्या गाठींचे बुकिंग करून घेतले. आयात करण्यास शासनाची मान्यता आहे. यामुळे भारतात तब्बल २२ लाख कापसाच्या गाठी येत आहेत. भारतातही सीसीआयकडे ११ लाख कापसाच्या गाठी पडून आहेत. या ठेवून काय होणार? यामुळे याचा कधीही लिलाव होऊन शकतो यामुळे सध्या मागणी नसल्याने कापसाचे भाव दबावाखाली आहेत. सध्या कापसाला ६ हजार ५०० ते ७ हजारांपर्यंत भाव मिळत आहे. खत, किटक नाशके, पेट्रोल अन् फवारणी करणाऱ्या मजुराचा रोजगार यासह कापूस वेचणीला प्रति किलो १० रु. मजुरी असून हा खर्च वाढल्याने या भावात कापूस विकणे शेतकऱ्याला परवडणारे नाही. कापूस ठेवावं तर आंतरराष्ट्रीय बाजारात उठाव दिसत नाही. देशात बाहेर देशातून २२ लाख गाठी कापूस येणार आहे. मग भाववाढ होणार कशी हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कापूस विकावा तर नुकसान ठेवावं तरीही नुकसान यामुळे कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकाटात सापडलेला दिसत आहे.
सत्ताधारी,विरोधक राजकारणात दंग
कापसाचे, सोयाबीनचे भाव पडलेले असल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. हाडांची काड करुन पिकविलेल्या मालाची किंमत माती झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण सुटण्याची अन् जमलेली लग्न मोडण्याची वेळ त्यावर आली आहे. पण यावर कोणीच बोलताना दिसत नाही. ना सत्ताधारी बोलत आहेत ना विरोधक या महत्वाच्या मुद्द्याला बगल देऊन जाती-पातीच्या मुद्यांना हवा देत द्वेषाचा भडका करुन स्वतःची सत्तेची पोळी भाजून घेण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांनी जागरुक होऊन याकडे पहाण्याची गरज आहे. असे मत सामाजिक जाणीव असणाऱ्यामधून व्यक्त केली जात आहे.