भवताली

कापसाचे उत्पादन घटल्याने अनेकांचा रोजगार बुडाला

 

अशीच अवस्था राहिली तर हमालांना पुन्हा कोयता धरावं लागणार!

आडस / प्रतिनिधी

लागवड घटल्याने कापसाची आवकच नाही. याचा परिणाम थेट मजुरांवर झाला असून जवळपास ५०० हमालांचा रोजगार बुडाला. पुढेही अशीच परिस्थिती राहिली तर अनेक वर्षांपासून सोडलेला कोयता पुन्हा हातात घेण्याची वेळ येणार असल्याचे दिसत असल्याने कापसाच्या गाड्या भरणारे हमाल चिंतेत आहेत.

बी.टी. कापूस येण्यापूर्वी ऊस हा एकमेव नगदी पीक समजले जायचे परंतु जास्त पाणी लागतं असल्याने ऊसाचे उत्पादन केवळ बागायतदार शेतकरी घेतात. त्यामुळे कोरडवाहू शेतकरी पारंपरिक शेती करत असल्याने हलाखीचे जीवन जगत असे. परंतु कापसाचे बी.टी. वाण आल्यानंतर कोरडवाहू शेतकरीही आर्थिक दृष्ट्या काही अंशी सक्षम झाल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे कापसाला पांढरं सोनं म्हणून ओळखले जाऊ लागले. कापसाचे भरघोस उत्पादन काढण्याचे आडस परिसरातील शेतकऱ्यांनी कसब आत्मसात केले. या परिसरातील कापूस दर्जेदार आणि लांब धाग्याचा असल्याने परराज्यातील व्यापारी येथे खरेदीसाठी येत असे. परंतु नियमित कापूस हे एकच पीक घेणे या शेतकऱ्यांच्या चुकीमुळे अथवा निसर्गाच्या बदलामुळे मागील काही वर्षांपासून कापसावर लाल्या, फकडी,बोंड अळी या विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढत गेला तसेच वाढता खर्च व मनुष्यबळ पहाता कापसाचे पीक घेणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले. सोयाबीन हा पर्याय उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी त्यास पसंती दिली. जे प्रमुख पीक म्हणून ओळखले जायचे तो कापूस केवळ ५ टक्के राहिला. उत्पादन घटल्याने येथील बाजारपेठेत दररोज शेकडो क्विंटल असलेली कापसाची आवक चारदोन क्विंटल वर आली. दहा ते बारा व्यापाऱ्यांच्या दररोज दोन-दोन गाड्या भरायचे आज पंधरा दिवसात एक गाडी भरणं मुश्किल झाले. प्रत्येक व्यापाऱ्यास कापसाच्या गाड्या भरण्यासाठी तीस ते चाळीस हमाल लागायचे. त्यामुळे आडससह परिसरातील ४०० ते ५०० लोकांना यातून चांगला रोजगार मिळायचा. त्यामुळे अनेकांनी ऊसतोडीसाठी जाणं बंद केले. पण आता कापूस कमी होत चालल्याने हमालांचा रोजगार बुडाला. अशी परिस्थिती पुढे राहिली तर हातातील सुटलेला कोयता पुन्हा घ्यावा लागतोय की, काय ? हा प्रश्न मजुरांना सतावत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »