कापसाची १० हजारांच्या दिशेने वाटचाल
लोकगर्जनान्यूज
बीड : कापसाची मागील काही दिवसांपासून दररोज दरवाढ सुरू असून, धारुर तालुक्यातील काही जिनिंगवर आज प्रतिक्विंटल ९ हजार ५०० ते ९ हजार ४०० दर देण्यात आले. ही दरवाढ पहाता कापसाची १० हजारांच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कापूस हा विदर्भ व मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले होते. परंतु मागील काही वर्षांपासून बोंड अळी, लाल्या सह आदि रोगांमुळे कापसाचे पीक नुकसानीचे ठरत असल्याने खर्च आणि उत्पनाचा ताळमेळ बसत नाही. रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने खर्च निघणं मुश्किल झाल्याने शेतकऱ्यांनी कापसाऐवजी सोयाबीनला पसंती दिली. यामुळे तीन वर्षांपासून सोयाबीन पेरा वाढल्याने कापसाची जागा सोयाबीन पिकाने घेऊन हे प्रमुख पीक ठरलं. परंतु गतवर्षी कापूस १२ ते १३ हजाराने विकला गेला तर सोयाबीन ७ हजाराने, ही दर तफावत पहाता काही शेतकरी पुन्हा कापसाकडे वळले असल्याने यावर्षी खरीपात क्षेत्र वाढले आहे. यावर्षी कापसाला दरही समाधान कारक मिळत आहे. यंदा कापसाचे मार्केट सुरु होताच दराने गगनभरारी घेतली पण मध्यंतरी कपड्यांची मागणी आणि निर्यात घटल्याने याचा परिणाम कापसावर झाला. यामुळे गठानचे दर घसरल्याने कापसाचे दरही दबावात आले. कापूस खाली उतरून ७ हजारांपर्यंत गेला. पण मागील काही दिवसांपासून पुन्हा कापूस बाजारात तेजी आली. दररोज दरवाढ सुरू आहे. आज गुरुवारी ( दि. १७ ) धारुर तालुक्यातील ( जि. बीड ) नर्मदा जिनिंग, धारुर येथे कापसाला ९ हजार ५०० तर विश्वतेज जिनिंग, खोडस ( आडस ) ९ हजार ५०४ तर नर्मदा कोटेक्स,भोपा ९ हजार ४५०, बालाजी जिनिंग, फ. जवळा ९ हजार ४२६ असे दर मिळाला आहे. दररोज यामध्ये १०० रु. प्रमाणे वाढ सुरुच आहे. अशीच दरवाढ राहिली तर १० हजारच्या पुढे कापूस जाऊ शकतो. शेतकरीही पिकवण्या सोबत बाजाराच्या बाबतीत जागरूक झाला आहे. वाढती दरवाढ पाहून बाजाच्या तेजी मंदीचा अभ्यास करुन माल विक्रीसाठी काढतोय तर, सध्या कापूस थप्पीला लावण्यास प्राधान्य देत आहे.