
लोकगर्जनान्यूज
बीड : कर्नाटक राज्यातील रेणुका शुगर या साखर कारखान्याचे ऊसाला प्रतिटन ३ हजार ६६० रु. असा विक्रमी दर जाहीर केल्याचे माध्यमांनी वृत्त दिले आहे. यानंतर महाराष्ट्रातील साखर कारखाने हा दर देणार का? असा प्रश्न ऊस उत्पादक विचारत आहेत.
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. जवळपास सर्व साखर कारखान्याचे बॉयलर पेटले आहेत तर, अनेक कारखान्यांचे मोळी टाकण्याचा कार्यक्रम झाला आहे. साखर कारखाने ऊसाला काय दर देणार? याची चर्चा सुरू असतानाच कर्नाटक राज्यातून ऊसाला विक्रमी दर जाहीर केल्याचे वृत्त आहे. रेणुका शुगर या खाजगी साखर कारखान्याने प्रतिटन ३ हजार ६६० रु. दर जाहीर केला आहे. याच समुहाचे राज्यात पश्चिम महाराष्ट्रात कारखाना असून तेथेही जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रमुखांनी असल्याचे वृत्तात म्हटले आहे. यामुळे रेणुका शुगरचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील साखर कारखाने असा दर देणार का? हा प्रश्न चर्चिला जातो आहे. राज्यातील कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.