करुणा मुंडेंची ‘शिवशक्ती सेना’ नवीन पक्षाची घोषणा
अहमदनगर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचं दावा करणाऱ्या करुणा मुंडे ( शर्मा ) यांनी आज गुरुवारी शिवशक्ती सेना या आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली. पुढील महिन्यात अहमदनगर येथे मेळावा घेऊन दिशा ठरविण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तसेच परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे आता या मेळाव्याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रामध्ये कोट्यावधींचे घोटाळे उघडकीस येत असून यामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या. पैसा दिल्याशिवाय पदे मिळत नाही. पद मिळाले की, तो पैसा काढण्यासाठी पुन्हा घोटाळे होतात. हे चक्र सुरु आहे. हा सर्व भ्रष्टाचार संपवायचा आहे . त्यासाठी माझा पक्ष काम करेल. महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आणि समाजाच्या हितासाठी काम करण्याची आवड असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश करावा असे आवाहन करुणा मुंडे यांनी केले. पुढील महिन्यात ३० जानेवारीला मेळावा घेऊन त्यामध्ये पक्षाचे चिन्ह , झेंडा आणि बोधचिन्ह तसेच निवडणूक लढवण्याच्या संदर्भात आचारसंहिता जाहीर केली जाणार असल्याची माहिती करूणा मुंडे यांनी दिली असून राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे म्हणाल्या आहेत.