कटलेरी मालासह चोरट्यांनी अप्पे रिक्षा पळवला

माजलगाव : आठवडी बाजारात बसून कटलेरी माल विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या गरिब व्यापाऱ्याचा घरोसमोरुन कटलेरी मालसह अप्पे रिक्षा चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना पात्रुड ( ता. माजलगाव ) येथे गुरुवारी ( दि. २८ ) रात्री घडली आहे. घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली आहे.
फैजान जमील मोमीन आणि सय्यद असलम ,रा. पात्रुड हे दोघं कटलेरी माल बाजारात विकण्याचा व्यवसाय करतात. हे करत असताना पै-पै जमा करून अप्पे रिक्षा घेतला. यामध्ये फिरुन ते व्यवसाय करत होते. गुरुवारी ( दि. २८ ) नेहमीप्रमाणे बाजारातून व्यवसाय करुन आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी बाजाराला जायचे म्हणून सर्व माल रिक्षातच ठेवून झोपी गेले. सकाळी उठून पाहिले असता रिक्षा गायब होता. अनेक ठिकाणी शोध घेतला असता तो मिळून आला नाही. यानंतर पोलीसांना खबर देण्यात आली. एम.एच. २१, १४१८ हा चोरी गेलेल्या रिक्षाचा क्रमांक आहे. तो पात्रुड येथून दर्गा रोडवर घरा समोरुन चोरी गेला आहे. रिक्षाच्या जागेवर काचांचा चुरा पडलेला असल्याने चोरट्यांनी काच फोडून रिक्षा चोरुन नेली असल्याचं अंदाज आहे. असा अप्पे रिक्षा दिसून आला तर ९९७०५७२६७० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.