कंटेनरची विद्युत रोहित्राला धडक; केज तालुक्यातील घटना
केज : भरधाव वेगात असलेल्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटून तो विद्युत रोहित्रावर जाऊन आदळल्याची घटना आज बुधवारी दुपारी केज-अंबाजोगाई रस्त्यावर कुंबेफळ येथे घडली. या अपघातात कंटेनरचा चालक व क्लिन्नर असे दोघेही जखमी आहेत. याप्रकरणी महावितरण कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित्राला धडकून कंटेनर पलटी झाला परंतु नशीब बलवत्तर म्हणून जिवीतहानी टळली असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी ( दि. १८ ) दुपारी २ च्या सुमारास केजकडून कंटेनर क्रमांक टी. एस. १२ यु डी १२९३ अंबाजोगाईच्या दिशेने चालला होता. दरम्यान कुंबेफळ ओलांडून पुढे जाताच अचानक चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला व तो सरळ रस्त्याच्या खाली उतरून महावितरण कंपनीच्या विद्युत रोहित्रावर जाऊन आदळला. यामुळे रोहित्र पुर्णपणे तुटून निकामी झाला. जवळपास ३ लाख रुपयांचे महावितरण कंपनीचे नुकसान झाले. काही पोल वाकडे झाले तर, विद्युत ताराही तुटून पडल्या आहेत. कंटेनरचे मोठे नुकसान झाले असून चालक, क्लिनर दोघेही जखमी झाले. परंतु विद्युत रोहित्राला धडक बसूनही करंट न उतरल्याने मोठी हानी टळली. या प्रकरणी महावितरणचे
कनिष्ठ तंत्रज्ञ अशोक विष्णू वैरागे यांच्या तक्रारीवरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास एएसआय रामधन डोईफोडे हे करीत आहेत. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने फोन केल्याने जखमींना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.