लोकगर्जनान्यूज
बीड : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा घास हिरावला असून, शेतकरी संकटात आहे. परंतु शासनाने दिलासा देणारा अद्याप निर्णय घेतला नाही. यामुळे गुरुवार ( दि. २७ ) सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत ओला दुष्काळ ट्रेंड सुरू आहे. यामुळे सकाळपासून सोशल मीडियावर शासन व प्रशासनाच्या विरोधात शेतकरी पुत्र पोस्ट करत असल्याने रोषाचा महापूर आल्याचे दिसून येत आहे.
परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. दररोज दहा दिवस सुरू असलेल्या पावसामुळे शेतात गुडघ्या बरोबर पाणी झाले. यामुळे सोयाबीनची जागेवरच माती तर कापसाची वात झाली. अनेक ठिकाणी काढून ठेवलेलं सोयाबीन वाहून गेले. यापुर्वीही पीक मध्य अवस्थेत असताना पावसाने ताण दिल्याने पीकांचे नुकसान झाले. त्यावेळीही शासन व विमा कंपनीने काही भाग वगळला तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. यातून वाचलेले पीक परतीच्या पावसाने हिरावले. ऐन काढणीच्या वेळीच निसर्गाचा कोप झाल्याने हातातोंडाशी आलेला घास गेला. यामुळे शेतकरी हवालदिल झाला. सर्वच गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. काही नुकसान झाले तर भरुन निघाव म्हणून शेतकरी पिकांचा विमा उतरवतो पण विमा कंपनीही मुनाफ्याला पसंती देत असून, अनेक नियम, अटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करत असल्याच्या खूप तक्रारी आहेत. नुकसान होऊनही शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शासनाकडून अद्याप दिलासा देणारं निर्णय झालेला नाही. रब्बी ची पेरणी तोंडावर आहे. पहिलीच उधारी दिली नाही आता बी-बियाणे, खंत कुठून आणायचे हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. परंतु अभ्यास करणाऱ्यांचे सरकार असल्याने त्यांचा अभ्यास कधी संपणार आणि शेतकऱ्यांना कधी दिसला मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा सर्व गोंधळ पहाता शेतकरी पुत्रांनी गुरुवारी ( दि. २७ ) सकाळी ११ पासून ओला दुष्काळ हा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू केला. रात्री ११ पर्यंत सुरू रहाणार आहे. या ट्रेंड अंतर्गत
वेळीच चुका सुधारा नेत्यांनो
शेतकरी पुत्रांची ठिणगी वणव्यात होऊ देऊ नका
शेतकऱ्यांचा मोडून पडला संसार,
पण मोडला नाही कणा,
नेटकऱ्यांनो तुम्ही फक्त लढ म्हणा…
#आम्ही_शेतकऱ्यांसोबत
मोठा वाडा पोकळ वासा
शेतकऱ्यां पोरं
गुंडाळाय लावणार लोकप्रतिनिधींना गाशा
नको घेऊ माघार
पोरा ज्योतिबाचा आसूड उगार
अशा विविध पोस्टचा सोशल मीडियावर महापूर आला आहे. शासन, प्रशासनाच्या विरोधात शेतकरी पुत्र रोष व्यक्त करत आहेत.