ओला दुष्काळ जाहीर करून, सरसकट नुकसान भरपाई द्या – आ.संदीप क्षीरसागर
बीड : यावर्षी शेतकऱ्यांवर भयंकर संकट आले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याचे चित्र असून जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून बीड विधानसभा क्षेत्रासह जिल्हाभरात अतिवृष्टी होऊन काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती देखील निर्माण झाली आहे. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन व कापसासह सर्वच पीकांचे संपूर्ण नुकसान झाले असल्याने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी शासनाकडे केली आहे.
ऐन पेरणीच्या काळात पावसाचे प्रमाण कमी झाले, त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरूवातीला सर्वदूर जोरदार पाऊस झाला मात्र या दरम्यान पेरणी झालेल्या प्रमुख पिकांपैकी सोयाबीनसह इतर पिकांवर गोगलगायींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. यानंतर सलग ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाची सरासरी कमी झाली आणि ऐन उभारणीत पिकांचे नुकसान झाले. पीक विम्याच्या बाबतीतही खाजगी वीमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे नुकसान झालेल्यांपैकी अनेक मंडळांना भरपाई मिळू शकलेली नाही. दरम्यान ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. बीड विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. पिकांवर सातत्याने आलेल्या संकटांनंतर ऐन काढणीच्या वेळीच अक्षरशः कापसाच्या वाती आणि सोयाबीनची माती झाल्याचे चित्र आहे. सर्वच पिकांचे संपुर्णत: नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना, हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाताना उघड्या डोळ्यांनी पाहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पालकमंत्री, मुख्य सचिव, कृषी आयुक्त, विभागीय आयुक्त यांच्याकडे पत्रांद्वारे केली आहे.प
सर्व्हर डाऊन!
झालेल्या नुकसानीची तक्रार क्रॉप इन्शुरन्स ॲप वर विमा कंपनीकडे करण्याचे सांगितले जात आहे परंतु सदरील यंत्रणेचे सर्व्हरच सध्या डाऊन आहे. याबद्दल काय नियोजन आहे? असा सवालही आ.संदीप क्षीरसागरांनी उपस्थित केला आहे.
‘एनडीआरएफ’ च्या निकषात बसणारे नुकसान
अनेक महसूल मंडळांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. हे नुकसान एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापना च्या निकषात बसणारे असून यातून मदत मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचेही आ.संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.