ऑनलाईन खरेदी फसवणूकीला निमंत्रण! फ्रिज परत जाऊ द्यायचा नसेल तर पाच रुपये पाठवा म्हणून तीन लाख लंपास

अंबाजोगाई : ऑनलाईन फ्रिज खरेदी केला. त्याच्या डिलिव्हरीच्या आगोदर तुम्ही ऑर्डर केलेल्या फ्रिजची डिलिव्हरी होल्डवर गेली आहे. त्यासाठी एका लिंकवर ५ रु. पाठविण्यास सांगितले. ५ रु. पाठवाताच खात्यातून परस्पर २ लाख ९९ हजार ९८६ रु. लंपास झाले. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबाजोगाई शहरातील खडकपुरा भागातील कम्प्युटर इंजनीअर असलेल्या देशपांडे बहीण-भावाणे ॲमेझोनवरून ऑनलाईन फ्रिज खरेदी केला. त्यासाठी संपदा सुधीर देशपांडे यांचा मोबाईल नंबर दिला. फ्रिजची डिलिव्हरी ( दि. ११ ) एप्रिल रोजी होती. दरम्यान ९ एप्रिल रोजी संपदा देशपांडे यांच्या मोबाईलवर अनोळखी फोन आला. त्याने देशपांडे यांना तुमच्या फ्रिजची डिलिव्हरी होल्डवर पडली आहे. तो परत जाऊ द्यायचा नसेल तर लिंक पाठवतो त्यावर ५ रु. पाठवा असे म्हटले. ५ रु. रक्कम कमी असल्याने त्या ठगाने पाठवलेल्या लिंकवर ५ रु. पाठवले परंतु यानंतर तीन टप्प्यांत तब्बल २ लाख ९९ हजार ९८६ रु. लंपास झाले. खात्यातून रक्कम लंपास झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाणे गाठून संपदा देशपांडे यांनी तक्रार केली. त्यावरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलीस करत आहेत. ऑनलाईन खरेदी फसवणूकीला निमंत्रण ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.