एसीबीने गुढी उभारली! केजमध्ये १२ लाख मागणाऱ्या संस्था चालक, मुख्याध्यापक सह इतर दोघे दीड लाखांची लाच घेताना अडकले
केज : तालुक्यातील तांबावा येथील शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकाला पेन्शन आणि थकित पगार काढण्यासाठी १२ लाखांची मागणी करुन दीड लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने संस्थेचा सचिव, मुख्याध्यापक व इतर दोघे असे चौघांना शहरातील एका मेडीकल मध्ये रंगेहाथ पकडले. संस्थेचा सचिव व मुख्याध्यापक लाचेच्या सापळ्यात अडकल्याची बातमी उघडकीस येताच केज तालुक्यात खळबळ उडाली असून. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एसीबीने सापळा यशस्वी केल्याने कारवाईची गुढी उभारली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
केज तालुक्यातील तांबवा येथील गजानन शिक्षण प्रसारक मंडळाच्या गणेश माध्यमिक विद्यालयात सेवानिवृत्त शिक्षकाची पेन्शन आणि थकित वेतन काढण्यासाठी खाजगी व्यक्तीच्या मध्यस्थीने संस्था चालक, मुख्याध्यापक यांनी १२ लाख रुपयांची मागणी केली. यातील दीड लाख रुपये देण्याचे ठरले होते. परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबी कडे तक्रार केली. तक्रारीवरून बीड एसीबीने सापळा रचून चाटे अशोक हरीभाऊ ( सचिव , गजानन शिक्षण प्रसारक मंडळ, तांबवा ), हंगे अनंत बाबुराव ( मुख्याध्यापक, गणेश माध्यमिक विद्यालय,तांबवा), कराड उध्दव माणिकराव, धस दत्तात्रय सुर्यभान या चौघांना दीड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पवित्र अशा शिक्षण क्षेत्रातील पडद्याआड असलेल्या काळ्याकुट्ट कारभार उघडकीस आला. या घटनेने केज तालुक्यात शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. सदरील कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक, अप्पर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बीडचे उपाधीक्षक शिंदे शंकर, पो.नि. धस अमोल, हनुमान गोरे ,सत्यनारायण खेत्रे ,भरत गारदे,सुरेश, सांगळे,श्रीराम गिराम,स्नेहलकुमार कोरडे,अमोल खरसाडे,अविनाश गवळी,संतोष राठोड, चालक म्हेत्रे गणेश यांनी केली. गुढीपाडव्या पासून हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते. त्याच दिवशी शनिवारी ( दि. २ ) लाचेचा सापळा यशस्वी करुन बीड एसीबीने गुढी उभारल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.