एमरजंसी लोडशेडींग; घामाच्या धारा, डासांची गुंईगुंई आडसवासियांनी आख्खी रात्र जागून काढली
महावितरण कंपनीच्या विरोधात जनतेत असंतोष पसरला
आडस : रात्री १० ते सकाळी ८ अशी आडस येथे एमरजंसी लोडशेडींग करण्यात आली. वीजपुरवठा बंद असल्याने उष्णतेमुळे प्रत्येकाला घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या तर डासांची गुंईगुंई व चाव्यामुळे रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. महावितरण कंपनीच्या आशिर्वादाने आडससह परिसरातील नागरिकांनी आख्खी रात्र जागून काढली. यात सर्वीधिक त्रास लहान बाळांना झालं असून हे चित्र पहाता कोळसा संपल्याचे कारण देत भारनियमन सुरू करणाऱ्या महावितरण कंपनी व शासन कोळसा संपेपर्यंत गोट्या खेळत होते का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार आले की, महाराष्ट्र अंधारात चाचपडत असून भारनियमन सुरू झाले अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. या सत्यता ही दिसत आहे. महाराष्ट्र शासन व महावितरण कंपनीकडून कोळसा संपल्याने एमरजंसी लोडशेडींग करावं लागतं असल्याचे सांगितले जात आहे. परंतु कोळसा अचानक संपला का? जर नसेल तर कोळसा आणण्यासाठी काय प्रयत्न झाले? की, महावितरण कंपनी आणि शासन झोपले होते का? गोट्या खेळत होते. असे अनेक प्रश्न जनतेतून विचारले जात आहेत. ऐन उन्हाळ्यात लोडशेडींग सुरू झाली असून उष्णतेमुळे आधीच जीवाची लाही लाही होत आहे. त्यात हे लोडशेडींग अन् त्याचाही वेळ नाही. कधी येणार कधीं जाणार ? याचा काहीच वेळापत्रक नाही. लोडशेडींग सुरू होताच महावितरणचे कर्मचारी, अभियंता सर्वच आपले मोबाईल बंद करून ठेवतात. त्यामुळे हे ठरवून जनतेचा छळ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. केज तालुक्यातील आडस येथे मंगळवारी ( दि. १२ ) साडेदहा वाजता वीजपुरवठा खंडित झाला तो सकाळी ८ वाजता सुरू झाला. आख्खी रात्र आडस व येथील ३३/ ११ केव्ही केंद्रातील सर्व गावे अंधारात बुडालेले होते. वीजपुरवठा बंद असल्याने सर्वांनी रात्र जागून काढली. परंतु आडस व परिसरातील अनेक गावांमध्ये सिंगल फेज योजना कार्यान्वित आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून ग्रामीण भागाला लोडशेडींग मुक्त करण्यासाठी ही योजना आणली गेली आहे. मग हे भारनियमन का? करण्यात येत आहे. भारनियमन होणारच असेलतर मग सिंगल फेज योजनेचा फायदा काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. उंटावरून शेळ्या राखणाऱ्या महावितरण कंपनीच्या वरीष्ठ अधिकारी व शासना विरुद्ध जनतेत असंतोष पसरल्याचे दिसून येत आहे.