भवताली

एक‌ फुले उधळतो अन् दुसरा उन्हाची काळजी घेतो; दोघांची चार पिढ्या पासून निस्वार्थ सेवा

लोकगर्जनान्यूज

केज : तालुक्यातील आडस येथील जिल्हा परिषद शाळेत दोघे चार पिढ्यांपासून ताठ उभे असून, यातील एक चिमुकल्यांसाठी फुलांची उधळण करतोय तर दुसरा ऊन लागू नये याची काळजी घेतो. ते दोघं कोणतेही जात,धर्म न पहाता चार पिढ्यांपासून निस्वार्थ प्रेम व सेवा देत आहेत. या दोघांच्याही येथील चार पिढ्यांकडे मनाच्या एका कोपऱ्यात अनेक आठवणी साठवून ठेवलेल्या आहेत. हे दोघं कोण असतील असा मानात प्रश्न पडला असेल तर ही बातमी पुर्ण वाचा ओळख पटेल.

बालपण व शालेय जीवन हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ समजला जातो त्यामुळे तरुण असो की, वृध्द एकदा तरी बालपण देगा देवा म्हणतो. या आठवणीही तशाच असतात ते कोणीही कितीही मोठा होऊ द्या विसरू शकत नाही. अशाच आडस येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या चार पिढ्यांच्या त्या दोघांबद्दल आहेत. यातील एक आहे चाफ्याचं झाडं असून दुसरा शेळवटचा झाडं हे दोन्ही झाड येथील शाळेत शिक्षण घेतलेल्या चार पिढ्यांचे साक्षीदार आहेत. चाफ्याला सध्या मोठ्या प्रमाणात फुले लागली आहेत. जून महिना म्हणजे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते. यावेळी अनेकजण इयत्ता १ ला प्रवेश घेऊन प्रथमच बाहेर जगात येतात. यांच्या स्वागतासाठी चाफा मे महिन्यांपासून फुलांची उधळण करत स्वागताची तयारी सुरू करतो. जून महिन्यात शाळा सुरू झाल्या की, सकाळी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी क्रीडांगणावर फुलांचा सडा टाकतो. तसा हा चाफा चार पिढ्यांपासून उभा असला तरी तो चढण्यासाठी खूप सोपा आहे. यामुळे अनेक मुलं याच्या अंगा खांद्यावर खेळून आनंद घेतात. यामुळे तो कधीही नाराज झाला नाही. त्यांने फक्त आनंदच देत शिक्षणाची गोडी निर्माण करुन पाया मजबूत केला. याचाच सोबती असलेले शेळवटचे झाड आहे. एक दुसऱ्याला खेटून असलेले हे झाड फक्त चिमुकल्यांना खूष ठेवण्याचा प्रयत्न करतात नव्हे ते ऊभे आहेत त्यासाठी. शेळवटचे झाड मोठं असल्याने त्यांच्या अंगा खांद्यावर कोणी खेळत नाही. पण हा झोका देण्याचे काम करतो. ऊन लागू नये म्हणून थंड अशी सावली देतो. हे त्यांच निस्वार्थ प्रेम मागील चार पिढ्यांपासून सुरू आहे. याचे अनेकजण साक्षीदार असून जे सेवानिवृत्त झाले तेही म्हणतात की, आम्ही शाळेत असल्यापासून हे दोन झाडं आहेत असे सांगतात. यांचा एक तिसरा जोडीदार सैतुसचा झाडं मागेच काही कारणास्तव नष्ट झाला. या दोन झाडांच्या अनेक आठवणी अनेकांच्या मनात घट्ट घर करून बसली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »