एएसपी पंकज कुमावत यांची चंदन तस्कर विरूद्ध मोठी कारवाई
लोकगर्जना न्यूज
बीड : एएसपी पंकज कुमावत यांनी चंदन तस्कराविरूध्द मोठी कारवाई केली. यामध्ये एक जणास ताब्यात घेऊन १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. २० लाख पेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरील कारवाई शनिवारी सायंकाळी ( दि. २३ ) नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत केली आहे.
समजलेली अधिक माहिती अशी की, एएसपी पंकज कुमावत यांना बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील महाजणवाडी येथे एका व्यक्तीने स्वतःच्या फायद्यासाठी चंदनाची झाडे तोडून आणून त्यातील गाभा काढण्याचे काम महाजनवाडीत सुरू असल्याची माहिती मिळाली. ही माहिती खात्रीलायक असल्याने कुमावत यांनी सहकार्यांसह महाजनवाडी कडे धाव घेतली. शिताफीने छापा मारला असता घटनास्थळी एक व्यक्ती मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याठिकाणी ५ क्विंटल पेक्षा जास्त चंदनाच्या गाभ्याचा साठा मिळून आला. तसेच एक जीप व इतर साहित्य असा एकूण २० लाख ७२ हजार ७०० रु. मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेतलेल्यासह १० जणांविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एएसपी पंकज कुमावत सह पथकातील महिला पोलिस आशा चौरे , बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, सय्यद अमजद, रामहरी भंडाने, राजू वंजारे , दीपक जावळे, संजय टूले , संजय कागदे यांनी केली. या कारवाईमुळे नेकनूर परीसरात खळबळ उडाली आहे.