ऊसाच्या ट्रॉलीला दुचाकीची धडक; अंबा साखरचे दोन कर्मचारी जखमी
अंबाजोगाई : काम संपल्यानंतर गावाकडे परत जाताना बर्दापूर पाटी जवळ उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॉलिला पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात अंबा साखरचे दोन कर्मचारी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. एकाची प्रकृती गंभीर असल्याने लातूरला हलविण्यात आले.
अंबा सहकारी साखर कारखान्यावर कामगार असणारे गणपत बरीदे आणि तुकाराम सोपान वाघमारे हे दोघं शिफ्ट संपल्याने दुचाकी क्रं. एम.एच.२४ ए एन १६३३ वर डबलसिट जात होते. दरम्यान बर्दापूर पाटीजवळ एक ऊस भरलेली ट्रॉली उभी होती. या ट्रॉलीवर सदरील दुचाकी पाठीमागून धडकली. यात दोघेही जखमी झाले असून गणपत बरीदे यांच्या पायाला गंभीर मार लागला असून त्यांचा पाय तुटल्याने लातूरला हलविण्यात आले. वाघमारे हा किरकोळ जखमी असून त्यांच्यावर उपचार करुन घरी पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अंबा साखर कारखान्यावरील कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन जखमी सहकार्यांना मदत केली.