उर्दू घर उभारून बाबा सिद्दीकींचे नाव देणार – डॉ.योगेश क्षीरसागर
बीडमध्ये जुनी ईदगाह मैदानावर १ कोटींच्या कामाचे उद्घाटन; मुलींचे वसतिगृह उभारणार
लोकगर्जनान्यूज
बीड : प्रलंबित असलेला उर्दू घर व मुस्लिम मुलींच्या वसतिगृहाचा प्रश्न येत्या वर्षभरात सोडविला जाईल. त्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा सुरू आहे. उर्दू घर उभारून त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे नाव देण्याचा ठराव मी मुस्लिम बांधवांसमोर मांडला. या ठरावास सर्वांनी एकमुखाने पाठिंबा देत होकार दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिली.
बीड शहरातील नाळवंडी नाका भागातील जुनी ईदगाह मैदानाचे सुशोभीकरण, बांधकाम यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती शहरी नगरोत्थान महाभियान (जिल्हास्तर) या योजनेतून १ कोटींचा निधी मंजूर केला होता. या कामाचे भूमिपूजन सोमवारी (दि.१४) डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. हे केवळ बोलण्यापुरते मर्यादित न ठेवता अजितदादा व धनुभाऊ यांच्या माध्यमातून कृतीतून सिद्ध करून दाखविले आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासह अल्पसंख्यांकाच्या विविध योजनांसाठी कोट्यवधींची तरतूद महायुती सरकारने केली आहे. त्यामुळे समाजाचे खरे हितचिंतक कोण आहेत, हे ओळखण्याची गरज आहे. उर्दू घरासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. येत्या वर्षभरात उर्दू घर उभारून त्याला दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे नाव दिले जाईल. तसेच, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुस्लिम मुलींच्या वसतिगृहाचाही प्रश्न सोडविला जाईल, अशी ग्वाही डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिली. याप्रसंगी मुफ्ती मोहीयोद्दीन साहाब, मौलाना मुख्तार साहब, मौलाना सद्दर, हाफिज नदीर, हाफेज नजमुद्दीन साहाब यांच्यासह माजी नगरसेवक, मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ख्रिश्चन स्मशानभूमीसाठी दिला ५० लाखांचा निधी
महाराष्ट्र अल्पसंख्यांक विभागाच्या योजनेतून बीड शहरातील अंकुश नगर भागातील ईडन गार्डन (ख्रिश्चन स्मशानभूमी) येथे ५० लक्ष रुपयांचा निधी दिला असून डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ख्रिश्चन धर्मगुरू चार्ल्स सोनवणे, नगरसेवक भीमराव वाघचौरे, गणेश वाघमारे, मरियन रेड्डी, आशिष शिंदे , किशोर पाटील, मथ्यू जोसेफ, पास्टर संजय गायकवाड, पा.अमृत सोनावणे, गजानन जवकर, बिपिन देशमुख, सुशांत सत्राळकर, प्रेमविजय भालतिलक आदी उपस्थित होते.
नाळवंडीत ईदगाह मैदानाचे सुशोभीकरण, बांधकामासाठी २७.५० लाखांचा निधी
बीड तालुक्यातील नाळवंडी येथे महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागांतर्गत मुस्लिम बांधवांसाठी ईदगाह परिसर येथे २७.५० लाख रुपयांच्या निधीतून सुशोभीकरण व बांधकाम होणार आहे. या कामाचे भूमिपूजन डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जि.प.सदस्य, सरपंच ॲड.राजेंद्र राऊत, उपसरपंच बंडू म्हेत्रे, ग्रा.पं.सदस्य गुलाब, नवगण शिक्षण संस्थेचे संचालक आमेर सिद्दिकी, शुभम कातांगळे, अरुण तंबरे, गणेश राऊत, गोरख काळे, वजीर, प्रदीप गायकवाड, खालेद, फारुख भाई, लल्लू खान, संजय काळे, गणी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.