कृषीप्रादेशिक

उपमुख्यमंत्र्यांचे दोन्ही दौरे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वांझोटे ठरले

सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षाच

लोकगर्जनान्यूज

बीड : पंधरा दिवसांत राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील दोन कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी ते सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याबाबत राहिलेले ४०० कोटींच्या नुकसान भरपाई अनुदानाची घोषणा करुन शेतकऱ्यांना दिलासा देतील अशी अपेक्षा होती. परंतु याबाबत काहीही न बोलताच ते परतले असल्याने हे दोन्ही दौरे शेतकऱ्यांसाठी वांझोटी ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

परतीच्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खरीप हंगामात अतोनात नुकसान झाले. यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. पिकांचा विमा काढूनही विमा कंपनीच्या जाचक अटीमुळे विमा मिळालेला नाही. काही शेतकऱ्यांना मिळाला त्यातील ही हजारो शेतकऱ्यांचा विमा परत जाणार असून बँक खाते होल्ड ( Hold ) करण्यात येत आहेत. तसेच अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शासनाकडे आठशे दहा कोटींची मागणी केली. यातील चारशे दहा कोटी अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून शासनाने मदत जाहीर केली. ती रक्कम येऊन पडलेली आहे. परंतु सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाईसाठी चारशे कोटींची गरज आहे. हे शेतकरी आज उद्या मदत घोषित होईल म्हणून शासनाच्या आदेशाकडे डोळे लावून बसलेले आहेत. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मागील पंधरा दिवसांत दोन वेळा जिल्ह्यात येऊन गेले. यापुर्वी ३१ डिसेंबर रोजी शिवसंग्रामच्या वतीने आयोजित व्यसनमुक्ती कार्यक्रमाला आले तेंव्हा ही त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. यानंतर रविवारी ( दि. १५ ) श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे आयोजित संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी तरी मा. देवेंद्र फडणवीस सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांबाबत काही बोलतील व राहिलेले चारशे कोटींची मदत घोषित करतील अशी अपेक्षा होती. परंतु यावेळीही त्यांनी याविषयी काहीच बोलले नाहीत. यामुळे या शेतकऱ्यांच्या नशीबी अजूनही प्रतिक्षा दिसून येत आहे. पंधरा दिवसांत दोन वेळा बीड जिल्ह्याचा दौरा उपमुख्यमंत्री यांनी केला असला तरी याचा मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा कवडीचाही फायदा न झाल्याने हे दोन्ही दौरे शेतकऱ्यांच्या दृष्टीने वांझोटी ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »