उपद्रवी वानरे पिंजऱ्यात कैद…लऊळ करांनी सोडला सुटकेचा निःश्वास
माजलगाव : तालुक्यातील लऊळ येथे मागी काही महिन्यांपासून दोन वानरांनी गावात धुडगूस घालत कुत्र्यांची पिल्ले उंचावरून फेकून देत मारली आहेत. लेकरांवरही चाल करु लागल्याने गावात वानरांची दहशत पसरली होती. आज ( दि. १८ ) अखेर नागपूरच्या पथकाने दोन्ही उपद्रवी वानरे पिंजऱ्यात कैद केली. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
कुत्र्यांनी वानरांच्या पिल्लाला मारल्या नंतर सुड भावनेने पेटून उठलेल्या वानरांनी कुत्र्यांच्या पिल्लांना उचलून नेत उंचावरून खाली फेकून देत ठार मारणे सुरु केले. यानंतर काही लहान लेकरांवरही चाल करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मात्र ग्रामस्थांमध्ये वानरांची दहशत निर्माण झाली. याची मिडियाने दखल घेतल्यानंतर वनविभागाने हे उपद्रवी वानरे पकडण्यासाठी नागपूरचे वनविभागाचे पथक पाचारण केले. या पथकाने गावात दाखल होताच अवघ्या दोन तासात दोन्ही वानरे पिंजऱ्यात कैद केली. कुत्रे, वानरांच्या सुडाचा खेळ संपवला.