उन्हाळी सोयाबीन तंत्रज्ञान
प्रादेशिक संशोधन केंद्र , अमरावती
डॉ . पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ , अकोला
उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन तंत्रज्ञान
सोयाबीन महाराष्ट्रातील खरीप हंगामातील महत्त्वाचे पिक असून दरवर्षी जवळपास ४२ ते ४४ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असते . खरीप सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत तयार झालेले बियाणे वेगवेगळ्या कारणांमुळे उगवणशक्तिमध्ये नापास होत असल्यामुळे दरवर्षी सोयाबीन बियाणे उपलब्धता बाबत समस्या निर्माण होत असून सुधारित वाणांचे बियाणे शेतकरी बंधूंना उपलब्ध करून देणे दिवसेंदिवस कठीण जात आहे . अशावेळी उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन घेतल्यास दर्जेदार बियाणे उपलब्ध होऊ शकेल . उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन खरीप हंगामाच्या तुलनेत कमी होते . दाण्याचा आकार लहान राहतो . साधारणत : उन्हाळी हंगामामध्ये तयार झालेल्या बियाण्याचा रंग पिवळसर हिरवट असतो . उन्हाळी सोयाबीन घरच्याघरी बियाणे तयार करण्यासाठी चांगले आहे . खरीप हंगामात बीजोत्पादन कमी झाल्यास किंवा बियाण्याची प्रत / उगवणशक्ती चांगली नसल्यास आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी उन्हाळी बीजोत्पादन घेण्यास हरकत नाही . त्या करिता खालील सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा .
> जमीन : मध्यम ते भारी प्रतीची , उत्तम निचरा होणारी जमीन या पीकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे . अत्यंत हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन येत नाही . शक्यतो खरिपामध्ये सोयाबीन घेतलेल्या शेतात उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन घेऊ नये . घ्यावयाचे असल्यास पेरणीच्या आधी हलकी पाण्याची पाळी देऊन उगवलेले सोयाबीन झाडे / तणे नष्ट करावीत . हवामान : सोयाबीन हे पीक सूर्यप्रकाशास संवेदनशील आहे . सोयाबीन पिकासाठी समशीतोष्ण हवामान अनुकूल असते . त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये पिकाची कायिक वाढीची अवस्था थोडीफार लांबण्याची शक्यता असते . सोयाबीनचे पीक २२ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात चांगले येते ; परंतु कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाले तर फुले व शेंगा गळतात , शेंगाची योग्य वाढ होत नाही व दाण्याचा आकार कमी होतो . वाणः पेरणीसाठी डॉ . पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ , अकोला ने विकसित केलेल्या सुवर्ण सोया ( एएमएस एमबी ५-१८ ) व पीडीकेव्ही अंबा ( एएमएस १००-३९ ) या वाणांची किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ , परभणी विकसित वाण एमएयूएस १५८ व एमएयूएस -६१२ या वाणांची किंवा महात्मा फुले कृषि विद्यापीठ , राहुरी विकसित केडीएस ७२६ , केडीएस ७५३ या वाणांची किंवा जवाहरलाल नेहरू कृषि विश्वविद्यालय , जबलपुर चे विकसित वाण जेएस ३३५ , जेएस ९३-०५ , जेएस २०-२९ , जेएस २०-६९ , जेएस २०-११६ या वाणांची निवड करावी . वरील वाण जर शेतकरी बंधूंनी खरीपहंगामा मध्ये पेरलेले असतील व त्या बियाण्याची उगवणशक्ती तपासून तकमी ७० टक्के उगवणक्षमतेचे बियाणे पेरणीसाठ रावे .
> बिज प्रक्रीयाः सोयाबीनवर विविध रोग येतात व त्यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते . रोग आल्या नंतर बुरशीनाशकाची फवारणी घेण्यापेक्षा पेरणीपूर्वी बियाण्यास @ ३ ग्रॅम कार्बोक्सीन ३७.५ % + थायरम ३७.५ % डीएस ( मिश्र घटक ) ( व्हिटाव्हॅक्स पॉवर ) किंवा पेनफ्लुफेन १३.२८ % + ट्रायफ्लोक्सस्ट्रोबिन १३.२८ % ( एव्हरगोल ) @ १ मिली किंवा थायोफिनेट मिथाईल + पायराक्लोस्ट्रोबिन ( झेलोरा ) @ २.५ ते ३ ग्राम प्रती किलो बियाणे या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी . रोपअवस्थेत खोड माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बियाण्याला थायोमीथाक्साम ३० एफ एस @ १० मिली प्रती किलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी . त्यानंतर नत्र उपलब्ध करून देणारे जिवाणू संवर्धक ब्रेडीरायझोबीयम जापोनिकम + स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५० ग्रॅम प्रत्येकी १० किलो बियाण्यास लावावे .
> पेरणीची वेळ : उन्हाळी हंगामात सोयाबीनची पेरणी डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवाडापर्यंत करावी . जर पेरणीस उशीर झाला तर पीकफुलोऱ्यात असताना व दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना म्हणजेच मार्च- एप्रिल महिन्यात जास्त तापमानामुळे फुले व शेंगा गळ होते व दाण्याचा आकार लहान होतो . त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते . जर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले असेल तर पेरणी थोडी लांबवून तापमान साधारण १५ अंश सेल्सिअस झाल्यावर पेरणी करावी . सोयबिनची पेरणी ४५ x १० से.मी. अंतरावर व ४ से.मी. खोलीवर करावी . पेरणीच्या वेळेस बियाणे जास्त खोलीवर पडल्यास व्यवस्थित उगवण होत नाही .
> बियाण्याचे प्रमाण : सोयाबीन लागवडीसाठी हेक्टरी ६०-६५ किलो बियाणे वापरावे ( एकरी २४-२६ किलो ) .
> पेरणीची पद्धत : उन्हाळी हंगामामध्ये सोयाबीन पिकाची पाण्याची गरज लक्षात घेता , पेरणी बीबीएफ पद्धतीने किंवा पट्टा पद्धतीने किंवा तीन ओळींनंतर एक ओळ रिकामी ठेवून पेरणी करावी , जेणेकरून पाणी देणे सोयीचे होईल तसेच जमिनीचा ओलावा टिकून ठेवण्यास मदत होईल .
खत व्यवस्थापन : पेरणी करते वेळीच हेक्टरी ३० किलो नत्र , ६० किलो स्फुरद , ३० किलो पालाश द्यावे ( हेक्टरी ६५ किलो युरिया , ३७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश ) . शक्यतो खत व्यवस्थापन करतांना सरळ खते द्यावी परंतु हे शक्य नसल्यास मिश्र खत देतांना २० किलो गंधक प्रती हेक्टरी पेरणीच्या वेळेस द्यावे . पेरणी नंतर ५० व ७० दिवसांनी २ टक्के युरियाची ( १०० लिटर पाण्यात २ किलो युरिया ) फवारणी करावी किंवा शेंगा भरण्याचे वेळेस २ टक्के १ ९ : १ ९ : १ ९ या विद्राव्य खताची फवारणी करावी .
> आंतरमशागत व तण व्यवस्थापन : पीक २० ते ३५ दिवसाचे असताना दोन कोळपण्या ( १५ ते २० दिवसांनी पहीली आणि ३० ते ३५ दिवसांनी दुसरी ) व एक निंदणी करून शेत तण विरहित ठेवावे . तण व्यवस्थापणासाठी शिफारशीत तणनाशकाचा अवलंब करीत असताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे .
> पाण्याचे नियोजनः पेरणी अगोदर तुषार सिंचनाने पाणी देऊन पेरणी करावी . थंडीमुळे तापमान कमी असेल तर पूर्णत : उगवणीसाठी १० ते १२ दिवस लागू शकतात . चांगल्या उगवणीसाठी पेरणीनंतर ५ दिवसांनी पुन्हा तुषार सिंचनाने हलके पाणी द्यावे . जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात १० ते १२ दिवसांच्या अंतराने तसेच मार्च व एप्रिल महिन्यात परिस्थितीनुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे . पिक पेरणी ते काढणी या कालावधीत साधारणत : जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० पाणी पाळ्याची आवश्यकता आहे . विशेषतः पीक फुलोरा अवस्थेत तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी .
> भेसळ काढणे : न बिजोत्पादना करिता घेतलेल्या वाणाच्या गुणधर्माशी न जुळणारी झाडे तसेच रोगग्रस्त झाडे उपटून टाकावीत . बिजोत्पादन क्षेत्राची पिकाच्या निरनिरळ्या अवस्थेत जसे पिक वाढीच्या अवस्थेत , फुलोरा , शेंगा भरण्याच्या वेळेस झाडाचे निरीक्षण करून वेगळ्या गुणधर्माची झाडे ( जसे फुलाचा रंग , खोड व फांद्यावरील लव , शेंगाचा रंग व केसाळपण , वाढीचाप्रकार , ई . ) वेळोवेळी उपटून काढावी.
> कीड व रोगाचे व्यवस्थापन : कीड व रोगाचे व्यवस्थापणासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारे शिफारस असलेल्या कीटक व बुरशीनाशकाचा गरजेनुसार वापर करावा . उन्हाळी सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझक व्हायरस हा रोग येण्याची संभावना जास्त असल्यामुळे पांढऱ्या माशीचा तसेच मावा , तुडतुडे यांचा प्रादुर्भाव दिसल्यास त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उगवणी नंतर १० ते १५ दिवसांनी पिवळे चिकट सापळे १५ x ३० सेंमी आकाराचे किंवा तत्सम आकाराचे हेक्टरी किमान १६० या प्रमाणे लावावेत . तसेच पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी . खोडमाशी , उंटअळी व तंबाखूची पाने खाणारी अळीच्या व्यवस्थापना करिता लेबल क्लेम शिफारशीत इंडोक्साकार्ब १५.८ ई सी @ ६.७ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी वापर करावा . खोडमाशी , चक्रभुंगा व उंटअळीच्या व्यवस्थापना करिता लेबल क्लेम शिफारशीत थायोमिथोक्झाम १२.६ टक्के + लाम्बडा स्याहलोथ्रीन ९ .५ टक्के झे . सी . @ २.५ मिली किंवा क्लोरॅनट्रीनिलीप्रोल १८.५ एस सी @ ३ मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी वापर केला असता विषाणू वाहक मावा व पांढरी माशी यांचे सुद्धा उत्तम व्यवस्थापन होते . काढणी व मळणी : बीजोत्पादन प्लॉटमध्ये पीक कापणीच्या १० ते १५ दिवस अगोदर बुरशीनाशक जसे कार्बन्डाझीम ( बाविस्तीन ) ०.१ % ( १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ) ची फवारणी करावी , जेणेकरून कापणीच्या वेळी पाऊस आल्यावर बियाण्यावर वाढणाऱ्या बुरशीच्या प्रादुर्भावापासून संरक्षण मिळेल . शेंगा पिवळ्या पडून पक्व होताच पिकाची काढणी करावी . कापणीचे वेळी दाण्यातील ओल्याव्याचे प्रमाण १५-१७ टक्के असावे .