उत्सवा पासून अलिप्त असणाऱ्या विधवांना गणपतीच्या आरतीचा मान
आडस येथील स्वराज्य गणेश मंडळाचा पुढाकार
लोकगर्जना न्यूज
केज : तालुक्यातील आडस येथील स्वराज्य गणेश मंडळाने विधवा महिलांना आरतीचा मान देऊन गणेश उत्सवात सहभागी करून घेतले. या उपक्रमाचे कौतुक होत आहे. आरतीसाठी जवळपास ३५ विधवांनी उपस्थिती लावून बुधवारी ( दि. ७ ) सकाळी ९:३० वाजता सामुहिक आरती केली.
विधवा महिलांना धार्मिक असो की, इतर उत्सव यामध्ये सहभागी होता येत नाही. त्या सर्व उत्सवा पासून अलिप्त रहातात. पती गेल्याच दुःख पचवून लेकरासाठी त्या आयुष्यातील मोठं दुःख विसरण्याचा प्रयत्न करतात. परंतु समाजातील अनेक रूढी परंपरा त्यांना परत-परत आठवण करून देत या महिलांना दररोज विधवा करतात. परंतु त्यांनाही आयुष्य आहे. त्यांनाही या आनंदात सहभागी होत आनंदी जीवन जगता यावं म्हणून सर्व प्रथम आडस येथील सुषमा आकुसकर यांनी विधवांसाठी कुंकवा पलिकडची संक्रांत साजरी केली. यास चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी चर्चा होऊन विधवांच्या मनातील दुःख अश्रुंच्या माध्यमातून बाहेर आले. यानंतर ग्रामपंचायत सदस्य शिवरुद्र आकुसकर यांनी विधवा प्रथा बंद चा ग्रामसभेत ठराव मांडला व तो मंजूर करण्यात आला. गणेश उत्सव आला. यातही सहभागी करून घेत. स्वराज्य गणेश मंडळाने बुधवारी ( दि. ७ ) सकाळच्या आरतीचा मान दिला. ९:३० वाजता आरती करण्यात आली. यावेळी जवळपास ३५ विधवा उपस्थित होत्या. प्रथमच विधवांच्या हस्ते आरती करुन त्यांनाही या आनंदाच्या महोत्सवात सहभागी करुन घेतले. स्वराज्य गणेश मंडळाचे या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच स्वराज्य गणेश मंडळ प्रतिवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. आरतीच्या वेळी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसह इतर महिला उपस्थित होत्या.