उंदरी येथील ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचे भिजत घोंगडे
शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी
आडस : केज तालुक्यातील उंदरी येथील मंजूर असलेल्या ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचे अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. याकडे संबंधितांनी लक्ष घालून याचे काम सुरू करावे अशी मागणी उंदरी सह परिसरातील शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.
उंदरी येथील शेतकरी हे आधुनिक पद्धतीने व मेहनतीच्या जोरावर आद्रक, केशर अंबा, डाळिंबाचे विक्रमी उत्पादन काढतो, परंतु विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागते. येथे धारुर येथून विजपुरवठा करण्यात येत असून सर्वात शेवटी उंदरी हे गाव येते त्यामुळे अत्यंत कमी दाबात शेतकऱ्यांना वीज मिळते. त्यामुळे शेतातील पाण्याचे पंप चालत नाही. पिकांना पाणी मिळत नसल्याने नुकसान होत आहे. अशीच अवस्था अनेक वर्षांपासून असून केज विधानसभा मतदारसंघाच्या ताई दिवंगत नेत्या डॉ. विमल मुंदडा यांनी येथील शेतकऱ्यांची ही अडचण दूर व्हावी व शेती हिरवीगार रहावी म्हणून त्यांच्या कार्यकाळात येथे ३३/११ के.व्ही. उपकेंद्राला मंजूरी मिळवून आणली. यासाठी लागणारी जमीनही संपादित करण्यात आली. त्यालाही जवळपास ७ ते ९ वर्ष होत असतील. यानंतर मात्र हे वीज उपकेंद्र धुळखात पडलेलं आहे. याकडे कोणाचेही लक्ष दिसत नाही. परंतु शेतकऱ्यांची बेजारी सुरू असून त्यात आता वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे.शेतकऱ्यांच भलं व्हावं अस वाटत असेल तर संबंधित अधिकारी, पुढारी यांनी लक्ष घालून उंदरी ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात येत आहे.