आ.नमिता मुंदडा यांनी दिल्या डॉ. अंजली घाडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
केज मतदरसंघात राजकीय चर्चांना आले उधाण
लोकगर्जनान्यूज
केज : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार च्या नेत्या डॉ.अंजली घाडगे यांचा आज वाढदिवस असल्याने महायुतीच्या उमेदवार आ.नमिता मुंदडा यांनी आज सकाळी त्यांच्या केज येथील घरी जाऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर केज मतदारसंघात विविध राजकीय चर्चांना उधाण आले असून, खरंच या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट आहे की, राजकीय घडामोडी घडणार आहेत. अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
केज विधानसभा मतदारसंघातून डॉ.अंजली घाडगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होत्या, त्यांनी रितसर पक्षात प्रवेश केला. मतदारसंघात जनसंपर्क सुरू केला होता. मात्र शेवटच्या क्षणाला पक्षाने उमेदवारीची माळ माजी आ. पृथ्वीराज साठे यांच्या गळ्यात घातली आहे. यामुळे त्या नाराज असू शकतात का? असा प्रश्न जनतेला पडत असला तरी त्या पक्षाचेच काम करत असून, पृथ्वीराज साठे यांच्यासाठी त्या मतदारसंघात प्रचार दौरे करीत आहेत. पण आज त्यांचा वाढदिवस असल्याने सकाळीच केज विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आमदार नमिता मुंदडा यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून केज येथील डॉ.अंजली घाडगे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा दिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पहाताच मतदारसंघात विविध चर्चांना उधाण आले आहे. आ.नमिता मुंदडा आणि डॉ.अंजली घाडगे यांची भेट ही फक्त शुभेच्छा देण्यासाठी झाली की, यामागे काही वेगळे कारण आहे का? निमित्त वाढदिवसाचे असले तरी या माध्यमातून काही राजकीय समीकरणे बदलणार का? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पाहू या आता नेमकं काय? घडतंय.