आष्टी तालुक्यातील दुर्दैवी घटना; ऊसतोड मजुर कुटुंबांवर कोसळले दुःखाचे डोंगर
लोकगर्जनान्यूज
आष्टी : ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुराचा दीड वर्षाच्या मुलाचा पाण्याच्या बादलीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना बुधवारी ( दि. ७ ) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास चोभीनिमगांव येथे घडली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
कानिफनाथ शिवाजी मिरास ( वय १८ महिने ) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. शिवाजी मिरास रा. वडाळी ( ता. जिंतूर जि. परभणी ) हे पत्नी व मुला सह ऊसतोडणीसाठी अंबालिका सहकारी साखर कारखाना राशिन यासाठी ऊसतोडणीचे काम करत आहेत. सध्या ही टोळी चोभीनिमगांव ( ता. आष्टी ) येथे ऊसतोडणीसाठी आलेली आहे. सकाळी लवकर कामावर जाण्यासाठी आवराआवर सुरू होती. यावेळी कानिफनाथ हा चिमुकला आई जवळ खेळत होता. आई कामात व्यस्त असताना चिमुकला पाण्याने भरलेल्या बादली जवळ गेला अन् तोल जाऊन आत पडला असावा, आई काम संपवून मुलाला शोधताना तो बादलीत बुडालेला मृतावस्थेत आढळला. मुलाला मृत पाहून आईने हंबरडा फोडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.