आमदार संदीप क्षीरसागरांना थोरल्या पवारांचे बळ: दिली मोठी जबाबदारी
लोकगर्जनान्यूज
बीड : अजित पवारांनी बंड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. यावेळी सर्व तळ्यात मळ्यात करत असताना बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सर्वप्रथम सदैव साहेबांसोबत अशी भुमिका जाहीर केली. यामुळे थोरल्या पवारांनी बळ देत आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.
बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना पक्षातून बडतर्फ केल्यानंतर नवीन जिल्हाध्यक्ष कोण? याची उत्सुकता लागली होती. परंतु ही उत्सुकता जास्त न तानता आमदार संदीप क्षीरसागर यांची बीड जिल्हाध्यक्षपदी खा. शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवड केली. येत्या काळात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यापूर्वी आमदार क्षीरसागर यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिल्याने थोरल्या पवारांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना बळ दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.