आमदार संदीप क्षीरसागरांची तत्परता उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी कामे सुरू
लोकगर्जना न्यूज
बीड : उद्घाटन होऊन देखील विकासकामांना कित्येक दिवस प्रत्यक्षात सुरूवात होत नसल्याचे दिसून येते. मंगळवारी ७० कोटींच्या रस्ते,नाली कामे आ.संदीप क्षीरसागर यांच्या सुचनेने उद्घाटनाच्या दुसर्याच दिवशी बुधवार तसे गुरूवारी (दि.२२) तात्काळ सुरू करण्यात आली.
बीड शहरामध्ये आ.संदीप क्षीरसागर यांच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेंतर्गत एकूण ७० कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. या मंजूर कामांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवार (दि.२०) रोजी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन केले होते आणि संबंधित कंत्राटदारांना कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत अशी सक्त सुचना केली होती. यावर उद्घाटनाच्या दुसर्याच दिवशी संबंधित कामांना प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली. बीड शहरातील विकास कामांचे उद्घाटन झाल्यापैकी मोंढा रोड परिसरातील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे, बार्शी रोड- दीप हॉस्पिटल ते रिपोर्टर भवन सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे तसेच पिंपरगव्हाण रोड परिसरातील अंबिका चौक ते अर्जुन नगर सिमेंट-कॉंक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे अशा एकुण तीन कामांना बुधवार (दि.२१) व गुरूवार (दि.२२) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांच्या सुचनेनुसार तात्काळ सुरूवात करण्यात आली. उद्घाटनानंतर कामांना प्रत्यक्षात लगेच सुरूवात झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.