आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक, जाळपोळ
लोकगर्जनान्यूज
बीड : मराठा आरक्षण आंदोलनाला माजलगावात हिंसक वळण लागले असून आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून जाळपोळ केल्याची घटना घडली आहे.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील दुसऱ्यांदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले असून आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी साखळी उपोषण, कॅंडलमार्च, रस्ता रोको असे आंदोलन करण्यात येत आहे. आज माजलगाव येथे आंदोलकांनी मोर्चा काढला होता. या दरम्यान माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. गेट तोडून आंदोलकांनी आत घुसून जाळपोळ केल्याची घटना काही वेळा पुर्वी घडली आहे. यामुळे मराठा समाज आक्रमक झालेला दिसून येत आहे. या घटनेने आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे.
आंदोलकांना शांततेचे आवाहन
आमदार प्रकाश सोळंके यांनी समाजाच्या भावना तीव्र असल्याचे सांगत मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचे समर्थन असल्याचे म्हटले आहे. तसेच आंदोलकांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन एका मराठी वाहिनीशी फोन वरून बोलताना केले.