आमचं गाव आमचा विकास कार्यशाळेकडे दुसऱ्या दिवशीही ग्रा.पं. सदस्यांनी पाठ फिरवली
लोकगर्जना न्यूज
केज : आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा बुधवारी न झाल्याने गुरुवारी ( दि. २९ ) सकाळी १० ते ५ यावेळेत घेण्यात आली. परंतु दुसऱ्यादिवशी ही आडस गणातील केवळ ९ सदस्य उपस्थित राहिले असल्याने ग्रामपंचायत सदस्य गावाच्या विकासा बाबत उदासीन असल्याचे दिसून आले. यामुळे मतदारांनी सदस्य निवडून देताना विचार करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया जागरुक नागरिक व्यक्त करीत आहेत.
महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषद बीड, पंचायत समिती,केज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कार्यक्रम अंतर्गत “आमचं गाव आमचा विकास” ग्रामपंचायत विकास आराखडा संबधिचे आडस गणातील आडस,कळमअंबा,बनकरंजा, उंदरी, केकतसारणी, जानेगाव, केकाणवाडी या ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसंसाधन गट यांचे एक दिवसीय कार्यशाळेचे बुधवारी ( दि. २८ ) आडस ( ता. केज ) येथे आयोजन केले होते. परंतु कोणीही उपस्थित न राहिल्याने याबाबत आडस येथील शिवरुद्र आकुसकर यांनी तक्रार केल्यानंतर केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांनी परत गुरुवारी ( दि. २९ ) सकाळी १० ते ५ वेळेत कार्यशाळा घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पुन्हा दुसऱ्या दिवशी आमचं गाव आमचा विकास कार्यशाळा पार पडली. परंतु दुसऱ्या दिवशी ही सात गावातील केवळ ९ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहिले. त्यामध्ये आडस १, जानेगाव ३, उंदरी २, कळमअंबा १, बनकरंजा १, केकाणवाडी १ अशी संख्या होती. तसेच सातही ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामसेवक उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या पहाता त्यांनी कार्यशाळेकडे सपशेल पाठ फिरवली असल्याचे दिसून येते. परंतु आहेत त्याच सदस्यांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये प्रशिक्षक म्हणून उपस्थित असलेले पं.स. विस्तार अधिकारी काशिद एस.पी. यांनी सविस्तर व सोप्या भाषेत ग्रामपंचायत कारभाराची, गाव आरखाडा, ग्रामसभा याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांनी काशिद यांचे आभार मानले. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका वाघमारे एस.बी., कृषी सहायक भाग्यश्री पतंगे, अंगणवाडी ताई, आशा सेविका उपस्थित होत्या.