आधीच पावसाची चिंता त्यात हरणांचा कोवळ्या पिकांवर ताव; शेतकरी मेटाकुटीला
केज : तालुक्यातील आडस येथे शेतकऱ्यांची पेरणी झाली. यानंतर बियाणे उगवले असून कोवळ्या पिकांसाठी आता पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाच्या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांवर दुसरं संकट उभं राहिलं आहे. हरणांच्या कळपांचा उपद्रव वाढला असून ते कोवळे पीक फस्त करत आहेत. यामुळे शेतकरी पाऊस व वन्य प्राणी या दुहेरी संकटामुळे मेटाकुटीला आला.
यावर्षी पाऊस लवकर न आल्याने पेरणी योग्य पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात तर जुलैच्या सुरवातीला पेरणी उरकून घेतली. जमिनीतील ओल चांगली असल्याने बियाणे चांगले उगवले आहेत. पण काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ही कोवळी पिके जळून जातात की, काय? ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. पावसाच्या प्रतिक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांचे संकट ओढावले असून, हरिण,मोर, रानडुक्कर यांचा उपद्रव वाढला आहे. तीस-चाळीस हरणांचा कळप येऊन काही क्षणातच कोवळ्या पिकांवर ताव मारत दोन खळ्यांच्या इतक्या क्षेत्रातील पीक फस्त करतात. मोरही कोवळ्या पिकांची शेंडे खाऊन टाकतात. रानडुक्कर खात नाही परंतु जमीन उकरुन नासधूस करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. थांबलेला पाउस अन् त्यात हे वन्य प्राण्यांचा उपद्रव या दुहेरी संकटात सापडल्याने शेतकरी मेटाकुटीला आला. या वन्यप्राण्यानेंचा शासनाने काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.