आडस येथे ४० मिनिट जोरदार पाऊस: पिकांना जीवदान
लोकगर्जनान्यूज
केज तालुक्यातील आडस येथे दुपारी ४० मिनिट जोरदार पाऊस झाला. यामुळे सुकत असलेल्या पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
आडस येथे दुपारी अचानक ढग दाटून आले. यामुळे पाऊस येणार असे चिन्ह दिसत होते. परंतु यावर्षी ढग आले तरी पाऊस येत नसल्याने प्रत्येकाची नजर आकाशाकडे होती. ३:३० वाजता पावसाला जोरदार सुरुवात झाली. तब्बल ४:१० पर्यंत पावसाने अक्षरशः आडसला झोडपून काढले असून यावर्षी पावसाळ्यातील हा पहिलाच मोठा पाऊस झाला. मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेंगा व पाते लागत असलेले सोयाबीन, कापूस सुकून चाललं होतं परंतु या पावसामुळे या पिकांना जीवदान मिळाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. परंतु अद्यापही नदीनाले कोरडे असल्याने बोअर, विहिरी कोरड्या असल्याने आणखी पावसाची गरज आहे. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे.