आडस येथे होणार विधवा प्रथा बंद? स्वातंत्र्य दिनी ठराव संमत
लोकगर्जना न्यूज
केज : विधवा महिलांचं आनंद व स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या प्रथा गावात बंद करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शिवरुद्र आकुसकर यांनी केली. तसा ठराव आडस ( ता. केज ) ग्रामपंचायतने घेतला असून, जिल्ह्यातील असा ठराव घेणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. यामुळे येथील विधवा प्रथा बंद होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
आपण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ७५ वा वर्ष साजरा केला. परंतु आजही काही रुढी परंपरा कायम असून, विधवा ही परंपरा मोडीत निघणं आवश्यक आहे. पती गेलेल्या त्या महिलेच्या दुःखाचा अंदाज कोणीही बांधु शकत नाही.तसेच लेकरं संभाळण्याची चिंता ही त्या आईला असते. परंतु विधवा प्रथेमुळे त्या महिले वर अनेक बंधने येतात. तीचे कुंकू पुसले जाते, पायातील जोडवी काढून सुवासिनीची ओळख मिटवून टाकण्यात येते. यामुळे काम निमित्ताने बाहेर पडणाऱ्या विधवांना अपमान सहन करावा लागतो. त्यांना अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येत नाही. या परंपरा जबरदस्तीने त्यांच्यावर लादण्यात येतात असे दिसून येते. या विधवा कुप्रथा बंद व्हायला हवी या विचाराने येथील ग्रामपंचायत सदस्य शिवरुद्र आकुसकर यांनी सोमवारी ( दि. १५ ) ऑगस्टला घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याची लेखी मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव एकमताने पास केला. असा निर्णय घेणारे बीड जिल्ह्यातील आडस पहिले गाव ठरलं आहे. या ठरावाचे अनेकांनी कौतुक केले. यासाठी गावात जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.