आडस येथे वीस दिवसांपासून कृत्रिम भीषण पाणीटंचाई; पाइपलाइन दुरुस्तीचा निधी गेला कुठे?
लोकगर्जनान्यूज
केज तालुक्यातील आडस येथे कृत्रिम भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सलग वीस दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही. त्यामुळे येथील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, खाजगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सतत पाइपलाइन फुटत असल्याने मागे दुरुस्ती केल्याचे सांगितले जात आहे. पण ऐन दिवाळीत गावकऱ्यांना पाणी न मिळाल्याने दुरुस्तीचा निधी गेला कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे.
आडस येथे दोन पाणीपुरवठा योजना आहेत. उंदरी व भावठाणा साठवण तलाव येथून येथे पाणीपुरवठा केला जातो. परंतु भावठाणा साठवण तलाव येथून आलेली मुख्य पाइपलाइनचा एक पाईप आडसच्या नदीमधून वाहून गेल्याने ही योजना मागील दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे गावाची तहान भागविण्याची पुर्ण मदार उंदरी पाणीपुरवठा योजनेवर आहे. परंतु मागील २० दिवसांपासून तेही पाणीपुरवठा बंद आहे. याबाबत विचारले असता वीजेचा बिघाड असल्याचे सांगितले जात आहे. पण २० दिवस झाले तरी हा बिघाड दुरुस्त न झाल्याने ग्रामपंचायतीला जनतेचे हाल बघण्यात आनंद मिळतोय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच वीजपुरवठा सुरू झाला तरी उंदरी येथून आलेली पाइपलाइन ही अनेक ठिकाणी फुटलेली आहे. त्यामुळे ५० ते ६० टक्के पाणी वाया जात आहे. टाकीत केवळ ४० ते ५० टक्के पाणी येत असल्याने पाणी आले तरी नागरिकांना ४-५ घागीरवर समाधान मानावे लागते. त्यामुळे दोन पाणीपुरवठा योजना असूनही येथे ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे वर्षाचे बाराही महिने कृत्रिम पाणीटंचाई असते. तर भावठाणा व उंदरी या दोन्ही पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यासाठी लाखोंचा निधी आलेलं होता पण २० दिवसांपासून दोन्ही पाणीपुरवठा योजना बंद असल्याने मग दुरुस्ती केली की, नाही? केली नसेल तर हा निधी गेला कुठे? निधी खर्च झाला नसेल तर गाव पाण्यासाठी वणवण भटकत असताना ग्रामपंचायत दुरुस्ती का करीत नाही. असे एक ना अनेक प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. दिवाळी सारखा सण पाण्याच्या शोधात गेला असताना याबाबत विचारले असता आठ दिवसांत दुरुस्ती होईल असे ग्रामविकास अधिकारी अशोक तोडकर म्हणत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आठ दिवसांत दुरुस्ती करतो – ग्रामविकास अधिकारी
मागील वीस दिवसांपासून येथील पाणीपुरवठा योजना बंद आहेत. दिवाळीही पाणी शोधण्यात गेली. याबाबत ग्रामविकास अधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता त्यांनी आठ दिवसांत दुरुस्ती करतो अशी प्रतिक्रिया दिली.