आडस येथे बसस्थानका अभावी महिला प्रवाशांची कुचंबणा
आडस : केज तालुक्यातील आडस येथे बसस्थानक नसल्याने प्रवासी महिला, मुलींना बसण्याची व्यवस्था नाही. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रतिक्षेत हॉटेल,पान टपरीचा आधार घेत तासनतास भरचौकात उभे रहावे लागत असल्याने एक प्रकारे कुचंबणा सहन करावी लागते. येथे बसस्थानक व्हावे अशी मागणी करण्यात येत आहे.
आडस शाळा, कॉलेज,दवाखान्यासह आठवडी बाजाराचे व चांगली बाजारपेठ असलेले याभागातील महत्त्वाचे गाव आहे. परिसरातील अनेक गावांतील लोकांचा येथे दररोज संपर्क येतो. अंबाजोगाई, लातूर, बीड याठिकाणी जाण्यासाठी येथूनच बसने जावे लागते. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना मोठ्या प्रमाणात नियमित प्रवासी देणारा हा थांबा आहे. मात्र अद्यापही येथे परिवहन महामंडळाचे बसस्थानक नाही. त्यामुळे महिला व मुलींना बसची वाट पाहत येथे थांबणे म्हणजे एक प्रकारे शिक्षाच असल्याचे म्हणणं चुकीचे ठरणार नाही. येथे महिलांना, मुलींना बसण्याची कोणतीही व्यवस्था नसून, त्यांना बस येईपर्यंत पाण्याच्या गुळण्या तर सुपारी खाणाऱ्यांच्या पिचकाऱ्या पासून बचाव करत हॉटेल,पान टपरीच्या आडोश्याचा आधार घेत बसची प्रतीक्षा करत ऊभे रहावे लागत आहे. महिलांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष दिसत नाही, परंतु विकासाच्या मोठ्या गप्पा मारल्या जातात. या विकासाच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या विरूद्ध महिलांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मोठं गाव येथील सुविधा व समस्यांचे परिसरातील गावावर परिणाम दिसून येतो. आडसला सामाजिक भान असलेले गाव म्हणून ही ओळख आहे. येथील महिलांनी एकत्र येत दारु विरोधात आंदोलन करुन याची प्रचिती दिलेली आहे. परंतु स्वतः च्या समस्यांसाठी या महिलाही एकत्र येताना दिसत नाहीत. त्यामुळे या प्रश्नाकडे कोणाचेही लक्ष नाही.
सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने जावे लागते उघडल्यावर
बसस्थानकच नाही तर सार्वजनिक स्वच्छतागृह कुठे असणार! यांमुळे बाहेरुन आलेल्या प्रवासी महिलांना नैसर्गिक विधी साठी उघडल्यावर जावे लागते. महिलांची ही सर्वात मोठी अडचण आहे. जिल्ह्याच्या खासदार, या भागाच्या आमदार याही महिला असून त्या याप्रश्ना कडे लक्ष देवून येथील महिलांचा बसस्थानक आणि सार्वजनिक स्वच्छतागृहाचा महत्त्वाचा प्रश्न सोडवतील का? असा प्रश्न विचारला जात आहे.