आडस येथे दोन महिन्यांचे धान्य गायब शिधापत्रिका धारकांचे बेमुदत आंदोलन
लोकगर्जना न्यूज
आडस : केज तालुक्यातील आडस येथील गरीबांचे दोन महिन्यांचे राशन मिळाले नाही. हे धान्य गेलं कुठं याचा शोध लावून राशन दुकानदारावर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी हनुमान मंदिर समोर बालाजी वाघमारे सह आदिंनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
राशन दुकानदारांची मनमानी कारभार सुरू असून महिनाभरात कोणीही आले तरी धान्य वाटप करणे, पावती देणे असा नियम आहे. परंतु स्वस्त धान्य दुकानदारांनी चार दिवसातच धान्य घेऊन जाव असा नियम केला. यानंतर येणाऱ्यांना धान्य दिले जात नाही. शिधापत्रिका धारकांना पावती दिली जात नाही. आतातर एका धान्य दुकानदाराने दोन महिन्यांचे धान्यच वाटप केले नाही. मग हे धान्य कुठं गेलं असा प्रश्न शिधापत्रिका धारक विचारत आहेत. अनेक वेळा याबाबत केज तहसीलला तक्रार ही केली परंतु यावर काहीच कारवाई केली नाही. यामुळे स्वस्त धान्य दुकानदार डी. एच. पोटभरे यांचा परवाना रद्द करा, जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांचे राशन वाटप करा, घेतलेल्या धान्याची प्रत्येकाला पावती द्यावी, धान्य देण्या अगोदरच शिधापत्रिका धारकांचे अंगठे घेण्याची पद्धत बंद करावी, केज पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गुरुवार ( दि. १३ ) पासून बालाजी गंगाधर वाघमारे यांच्या सह आदि शिधापत्रिका धारकांनी हनुमान मंदिर समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. गुरुवार हा पहिला दिवस असून, आडसचे तलाठी चंद्रकांत कांबळे वगळता या आंदोलनाकडे महसूलचा कोणी कर्मचारी फिरकला नाही. आंदोलनानंतर तरी या गोरगरीबांना न्याय मिळेल की, नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.