आडस येथे कृषी विभागाकडून सोयाबीन नुकसानीचे पंचनामे सुरू
लोकगर्जना न्यूज
केज : तालुक्यातील आडस येथे पावसाने दडी मारल्याने सोयाबीन सुकून मोठं नुकसान झाले. या नुकसान झालेल्या पिकांचे सोमवारी ( दि. ५ ) कृषी विभागाने पंचनामे करण्यास सुरुवात केली. या पंचनाम्यात मोठं नुकसान झाल्याचे दिसून आले. पंचनामे सुरू झाल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
ऑगस्ट महिन्यात आडस व परिसरात पावसाने तब्बल २० ते २२ दिवस पावसाने दडी मारली होती. हा काळ सोयाबीनला फुले व शेंगा लागण्याचा म्हत्वाचा टप्पा होता. यावेळी पावसाने पाठ फिरवल्यामुळे सोयाबीन करपून फुल व शेंगा गळती झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होऊन आर्थिक फटका बसणार आहे. या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत होती. या मागणीची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी २५ टक्के ॲग्रीमसाठी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार सोमवारी ( दि. ५ ) आडस ( ता. केज ) येथे पंचनामे सुरू केले. यामध्ये आडस येथील प्रभारी कृषी मंडळाधिकारी रविकांत ठोंबरे, कृषी सहायक निर्मळ एल. टी., विमा प्रतिनिधी संजय तपसे यांनी प्रत्येक्ष बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे केले. सोमवारी तब्बल ८० हेक्टर क्षेत्राची पहाणी केली. परंतु नंतर पाऊस सुरू झाल्यामुळे पाहाणी करता आली नाही. दोन दिवसांत पुर्ण पंचनामे होतील असे कृषी मंडळाधिकारी रविकांत ठोंबरे यांनी सांगितले. यावेळी सोबत आडस येथील शिवरुद्र आकुसकर, बाळासाहेब देशमुख, गजानन देशमुख, ओमकार आकुसकर, नागनाथ आकुसकर, सुरेश खाडे, शिवशंकर इंगोले हे सोबत होते.