आडस येथे एमजीबी बँकेत चोरीचा प्रयत्न
आडस : केज तालुक्यातील आडस येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत अज्ञात चोरट्याने चोरीचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. चोरीरट्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात यश आले नाही अशी माहिती पोलीसांनी दिली. या प्रकरणी शाखाधिकारी तक्रार देण्यासाठी धारुर येथे गेले आहेत.
येथील हनुमान मंदिर समोर महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे. गुरुवारी ( दि. ३० ) रात्री अज्ञात चोरट्यांनी स्वच्छता गृहाच्या बाजुला असलेल्या लाकडी दरवाजाची फळी काढून आत शिरले. आतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु यात चोरट्यांना यश आले नाही. त्यामुळे मोठं नुकसान टळले. तिजोरी फोडण्यापुर्वी सायरण वाजू नये म्हणून व सीसीटीव्हीत कैद होऊन नये म्हणून चोरट्यांनी आतील सर्व वायरिंग तोडून व आतील अनेक कागदपत्रे अस्तव्यस्त करुन टाकले असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी फिर्याद देण्यासाठी शाखाधिकारी धारुर येथे गेले आहेत. त्यामुळे अधिकृत माहिती समजु शकली नाही. बँकेतच चोरीचा प्रयत्न झाल्याने खळबळ माजली आहे.