आडस येथे उद्या बंद अन् रस्ता रोको आंदोलन
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथे शनिवारी ऐवजी रविवारी ( दि. ३ ) बंद व रस्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आली. जालना जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ तसेच वीज प्रश्नी व २५ टक्के अग्रीमच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला. राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले असून शनिवारी ( दि. २ ) बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. परंतु शनिवारी आडस येथील आठवडी बाजार असल्याने येथे बंद मध्ये सहभाग घेण्यात आला नाही. त्याऐवजी रविवारी ( दि. ३ ) सकाळी १० वाजता जालना जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ तसेच दुष्काळी परिस्थिती पहाता होळ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्याची व वीजपुरवठा झालेला खेळखंडोबा दुरुस्त करुन नियमित वीजपुरवठा देण्यात यावा, गावठाण फिडर करून आडस येथे थ्री फेज रोहित्र बसविण्यात यावेत या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच आडस बंदची हाक देण्यात आली. याबाबत तहसीलदार,कृषी अधिकारी, पोलीस यांना निवेदन देण्यात आले आहे. या मध्ये शेतकऱ्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.