आडस मानेवाडी रस्त्यावर दुचाकी घसरली एक गंभीर जखमी
आडस ते मानेवाडी,उंदरी, पिसेगाव रस्त्याची दुरवस्था झाल्याने पायी चालणे ही मुश्किल झाले आहे. पुर्ण रस्ता उखडून खडी पसरली असल्याने स्लिप होऊन दुचाकीचा अपघात झाला. दुचाकीस्वार गंभीर जखमी असून अंबाजोगाई येथे खाजगी वाहनातून हलविण्यात आले. सदरील घटना आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आडस-मानेवाडी दरम्यान घडली आहे.
बाळू व्हरकटे रा.व्हरकटवाडी ( ता. धारुर ) असे जखमीचे नाव आहे. बाळू व्हरकटे हे मानेवाडी ( ता. केज ) येथे नातेवाईकाला सोडून दुचाकीवरून क्रमांक एम.एच. ४४ आर ०६४३ वरुन परत जाताना आडस शिवारातील विठ्ठल ढोले यांच्या शेताजवळ खराब रस्त्यामुळे दुचाकी घसरून ( स्लिप ) ते खाली पडले. डोक्याला गंभीर जखम झाली असून काणातून रक्त येत असल्याचे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितले. रस्त्यावरुन जाणाऱ्या मानेवाडी येथील ग्रामस्थांनी ओळखून खाजगी वाहन बोलावून अंबाजोगाई येथे दवाखान्यात घेऊन गेले आहेत. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने सांगितले जात आहे. आडस ते मानेवाडी, उंदरी, पिसेगाव हा पुर्ण रस्ता उखडून गेला आहे. त्यामुळे रस्त्यावर फक्त खड्डे, माती आणि खडीच आहे. चार चाकी वाहने अनेक दिवसांपासून या रस्त्यावरुन बंद झाली आहेत. दुचाकीस्वार जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करत आहेत. त्यांचे अपघात घडत आहेत. या भागातील पुढाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे.
आलेला निधी श्रेय वादातून परत गेला!
आडस ते पिसेगाव हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुर होऊन यावर युतीच्या काळात निधीही पडला होता. परंतु तत्कालीन आमदार व त्यांच्याच पक्षाच्या एका वजनदार नेत्यांचा श्रेयवाद उफाळून आला. माझा का तुझा गुत्तेदार काम करणार यामध्ये कामच झाले नाही. निधी पडून राहिला. महाविकास अघाडीचे सरकार येताच त्यांनी हा निधी दुसऱ्याकडे वळवला. या पुढाऱ्यांच्या वादांमुळे मात्र आडस, मानेवाडी, उंदरी, गांजपूर, जानेगाव, पिसेगाव येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.