आडस परिसरात अवकाळी पाऊस
पिकांना दिलासा परंतु ढगाळ वातावरणाचा फटका
आडस / प्रतिनिधी
शेती पंपाचा विजपुरवठा तोडण्यात आल्याने पाण्याविना पिकं जळून जाण्याच्या मार्गावर होते. शुक्रवारी रात्री १२ पासून पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले परंतु मागील आठ ते दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने याचाही फटका पिकांना बसत आहे.
शुक्रवार ( ३ ) रात्री सव्वा बारा पासून आडस परिसरात सुरू झालेलं अवकाळी पाऊस थोड्या-थोड्या विश्रांती नंतर पहाटे पर्यंत सुरू होता. पावसाच्या सरी मध्यम असल्याने प्रत्येक थेंब जमिनीत मुरला असल्याने पाण्याविना सुकत असलेल्या गहू, ज्वारी रब्बी पिकांना जीवदान मिळाले. मात्र आठवडा होत असून ढगाळ वातावरण आहे. सकाळी धुकं ही पडत असून याचा पिकांवर परिणाम होत आहे. हरभरा, भाजीपाला, तूर यासह सर्वच पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे स्वच्छ वातावरण निर्माण व्हावे असे शेतकरी म्हणतं आहेत.