आडस-धारुर सह विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी संभाजी ब्रिगेडचा उद्या रस्ता रोको आंदोलन
लोकगर्जनान्यूज
धारुर : आडस ते धारुर, आडस ते उंदरी,आडस-दिंद्रुड या रस्त्यांची दैनिय अवस्था झाली. अनेक वर्षांपासून याकडे कोणी ढुंकूनही पाहत नसल्याने संभाजी ब्रिगेडने या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी म्हणून आंदोलनाचा इशारा दिला. उद्या शुक्रवारी ( दि. २१ ) सकाळी ११ वाजता आडस-धारुर रस्त्यावर धारुर येथून १ कि.मी. अंतरावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जनतेनं उपस्थित रहावे असे आवाहन प्रवीण ठोंबरे यांनी केलं आहे.
राज्यरस्ता क्र. २३२ वरील आडस ते धारुर रस्त्याची खड्डे पडल्याने अक्षरशः चाळण झाली. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावर फक्त खड्डे बुजवण्यात येत आहेत. खड्डे बुजवून घेतले की, पंधरा दिवसात ते उखडून रस्त्याची जैसे थे अवस्था होते. सध्या तर या रस्त्यावर गुडघ्या बरोबर खड्डे पडलेले असून आडस ते धारुर हे १३ कि.मी. चे अंतर पार करण्यासाठी वाहन धारकांना जवळपास १ तास लागतो आहे. या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान तर होतच आहे पण प्रवाशांनाही मनक्याचे आजार जगण्याची शक्यता नाकारता येत नाही. फक्त याच रस्त्याची अवस्था बिकट नाही तर आडस ते उंदरी-पिसेगाव, आडस ते दिंद्रुड हा रस्ता पाहिलं असता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न प्रवाशांना पडतो आहे.या रस्त्याच्या दुरावस्थेला स्थानिक पुढारी कारणीभूत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दवाखान्यात जात असलेल्या गरोदर मातांची रस्त्यात प्रसुती झाली आहे. वाहनेही वेळेवर पोचत नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोचता येत नाही. त्यामुळे या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, दोन वर्षात बुजविलेल्या खड्ड्यांची चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन यापुर्वीच संभाजी ब्रिगेडने धारुर तालुका प्रशासनाला दिले आहे. तरीही त्यांनी काहीच पावलं न उचलल्याने उद्या शुक्रवारी ( दि. २१ ) सकाळी ११ वाजता धारुर – आडस रस्त्यावर धारुर पासून १ कि.मी. अंतरावर आडस रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे यांनी लोकगर्जनान्यूजशी बोलताना दिली. या आंदोलनात धारुर, आडस, पांगरी,पिंपरी, आवरगाव, वाघोली,खोडस येथील विद्यार्थी,तरुण, वृद्ध अशा सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.