आडस-धारुर रस्त्यावर दुचाकीची समोरासमोर धडक; दोघे जखमी एकाची प्रकृती गंभीर
लोकगर्जना न्यूज
आडस-धारुर रस्त्यावर कोळपिंप्री गायरान जवळील वळणावर दुचांकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीवरील दोघे जखमी झाले. यातील एकाला डोक्याला मार लागल्याने प्रकृती चिंताजनक असल्याने लातूरला हलविण्यात आले तर, दुसऱ्या जखमीवर अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरील घटना आज बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली आहे.
धारुर तालुक्यातील खोडस येथील जितेंद्र नामदेव काटे हा तरुण दुचाकी क्रमांक एम.एच. ४४ एम ९८६७ वर धारुर येथून आडसकडे येत होता. दुसरा व्यक्ती आडसकडून धारुरला दुचाकी क्रमांक एम.एच. ४८ ए यू ४२२३ वरुन जात होता. या दुचाकीस्वाराचे नाव समजु शकले नाही परंतु तो माजलगाव तालुक्यातील चाटगावचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या दोन्ही दुचाकींची कोळपिंप्री शिवारातील गायरान जवळील वळणावर समोरासमोर धडक झाली. यामध्ये जितेंद्र काटे यांना डोक्याला मार लागला असून, इतरही ठिकाणी मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. दुसरा व्यक्तीला पाय तुटल्याचे सांगितले जात आहे. दोघांनाही तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु जितेंद्र काटेची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले.