आडस जि.प. शाळे संबंधी आंदोलनाचा पाचवा दिवस

लोकगर्जना न्यूज
केज तालुक्यातील आडस जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झालेली आहे. निकामी असलेल्या धोकादायक इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना बसविण्यात येते. त्यामुळे येथे अनुचित घटना घडू शकते म्हणून धोकादायक इमारत पाडण्यात यावी म्हणून येथील महिलेने बेमुदत आंदोलन सुरू केले. मंगळवार ( दि. १६ ) हा आंदोलनाचा ५ वा दिवस आहे. रविवारी ( दि. १४ ) शिक्षणाधिकाऱ्यांनी भेट दिली परंतु आंदोलन मागे घेण्यास महिलेने नकार देत इमारतीला बुलडोझर लावण्यात येईल तेव्हाच उठणार असे अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
आडस येथे जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळा, कन्या आणि उर्दू अशा तीन शाळा आहेत. येथे जुनी शाळेची भव्यदिव्य अशी इमारत आहे. परंतु सदरील इमारत जूनी झाल्याने ती निकामी झाली आहे. यामुळे जिल्हा परिषदेने नवीन शाळा खोल्या बांधल्या आहेत. परंतु त्यातील सात खोल्या या निकामी इमारतीच्या मागे बांधलेल्या आहेत. त्यामुळे तेथे विद्यार्थी बसविण्यात येत नाहीत. बसवलेतर धोकादायक इमारतीमुळे धोका झाला तर जिम्मेदार कोण? म्हणून कन्या व उर्दू शाळेचे काही वर्ग जुन्या इमारतीच्या समोरील बाजूच्या खोलीत भरवण्यात येतात. त्यामुळे ही इमारत कधी पडेल याचा नेम नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून ही इमारत पाडण्यात यावी म्हणून येथील सविता आकुसकर या मागील ९ वर्षांपासून लढा देत आहेत. यापुर्वीही याच मागणीसाठी सन २०१३ व २०१८ मध्ये आंदोलन केले. २०१८ मध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दोन महिन्यांत सदरील निकामी इमारत पाडण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. परंतु चार वर्षे लोटली तरी जैसे थे अवस्था आहे. त्यामुळे पुन्हा तिसऱ्यांदा ( दि. १२ ) शुक्रवार पासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. आतापर्यंत गटशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, उप शिक्षणाधिकारी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु आंदोलन करती आधी बुलडोझर लावा या आपल्या मागणीवर ठाम आहे. तसेच जिल्हाधिकारी व जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिक यांनी आडस येथे भेट देऊन इमारतीची दूरावस्था पाहावी, इमारत चांगल्या स्थितीत आहे असे ते म्हटले तर मी आंदोलन मागे घेईल असे ही सांगितले आहे. मंगळवार ( दि. १६ ) हा आंदोलनाचा पाचवा दिवस असल्याने जिल्हा परिषद प्रशासन काय निर्णय घेणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.