आडस-कळमअंबा रस्ता खड्ड्यात हरवला; प्रवासी व भक्तांचे हाल
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस ते कळमअंबा हा पाच कि.मी. चा रस्ता, या रस्त्यावरच रेणूका माता मंदिर ( माळावरची आई ) आहे. परंतु हा रस्ता पार उखडून गेला असल्याने दुरावस्था झाली आहे. याचा आडस, कळमअंबा सह आदि प्रवाशांना तसेच मंदिराला जाणाऱ्या भक्तांचे हाल होत आहेत. काही महिन्यांपूर्वी कळमअंबा ते चंदन सावरगाव रस्ता झाला पण हा रस्ता का? होऊ शकला नाही. याबाबत जनतेतून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मागील काही वर्षांपासून बीड जिल्ह्यात रस्त्यांची खूप चर्चा आहे. चार राष्ट्रीय महामार्ग आम्ही केले म्हणून पाट थोपटून घेण्यात पुढारी कसर सोडत नाहीत. पण दुसरीकडे ग्रामीण भागातील रस्त्यांवर मागील अनेक वर्षांपासून एक टोपल माती टाकली गेली नाही. यामुळे रस्ते उखडून त्यांचे केवळ अवशेष शिल्लक दिसत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे केज तालुक्यातील आडस-कळमअंबा रस्त्याचे देता येईल. हा रस्ता केवळ पाच किलोमीटर अंतराचा आहे. कळमअंबा येथून सर्वात जवळची बाजारपेठ आडसची आहे. त्यामुळे घरातील मिठा पासून ते शेती साहित्या पर्यंत सर्व वस्तू खरेदीसाठी आडस येथे यावं लागत. पण रस्ता पुर्णपणे उखडून गुडघ्या बरोबर खड्डे झाले आहेत. यामुळे हा रस्ता खड्ड्यात हरवल्याचे चित्र आहे. यामुळे कधी दुचाकी घसरून पडेल अथवा पंचर होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अनेकजण पाच कि.मी. ऐवजी २० का.मी. अंतरावर असलेल्या केजला जाणे पसंत करत आहेत. याचा आडसच्या बाजारपेठेवर परिणाम झाला. तर लांब जावे लागत असल्याने कळमअंबा येथील ग्रामस्थांचा वेळ व पैसा वाया जात आहे. तसेच या रस्त्यावर आडस, कळमअंबा परिसरातील आराध्य दैवत असलेल्या रेणुका माता ( माळावरची आई ) मंदिर आहे. येथेही अनेक भक्त दर्शनासाठी जातात. त्यांना या रस्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे भक्तांचेही हाल होत आहेत.
तो होऊ शकतो हा का नाही?
आडस, कळमअंबा,चंदन सावरगाव हा एकच १० कि.मी. चा रस्ता आहे. कळमअंबा ते चंदन सावरगाव हा रस्ता काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून झाला. मग कळमअंबा ते आडस हा रस्ता का? झाला नाही. यासाठी केंद्र शासनाकडे निधी देण्यासाठी नव्हता की, या भागातील पुढारी पाठपुरावा करण्यात कमी पडले. असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.