आडसमध्ये परिचारिकेचे घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रपरिसरातील चोरीची पहिलीच घटना!
लोकगर्जना न्यूज
आडस : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेचे शासकीय निवासस्थानाचा पाठी मागील दरवाजा तोडून अज्ञात चोरटे घरात घुसले आतील तीन तोळे सोन्याचे दागिने, गॅस सिलिंडर,रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. प्राथमिक आरोग्य केंद्र झाल्यापासून चोरीची पहिलीच घटना आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, प्राथमिक आरोग्य केंद्र,आडस ( ता. केज ) येथे रंजना गणेश केकाण या परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्या प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील शासकिय निवासस्थानी रहातात. दसरा तोंडावर आल्याने घराची साफसफाई करण्याचे काम सध्या जोरदार सुरू आहे. रंजना केकाण याही शनिवारी ( दि. २४ ) सायंकाळी साफसफाई साठी केकाणवाडी येथे गेल्या होत्या. आज सोमवारी ( दि. २६ ) त्या परत आल्या असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यांनी घर उघडताच मागील दरवाजा तोडलेला दिसून आलं. चोरी झाली की, काय म्हणून दागिने ठेवलेली पिशवी पाहिली असता झुंबर, लॉंग गंठण,पोत असं जवळपास ३ तोळे सोन्याचे दागिने, गॅस सिलिंडर, रोख दिड हजार असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन झाल्यापासून या परिसरातील ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. चोरीची घटना उघडकीस येताच येथील इतर कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. याप्रकरणी तक्रार देण्यासाठी केकाण धारुर येथे गेले आहेत. तर माहिती मिळताच आडस चौकीचे जमादार प्रकाश सोळंके यांनी घटनास्थळी भेट दिली. येथे चौकी असूनही तक्रार देण्यासाठी ठाण्यातच धारुरला जावं लागतं. चौकी म्हणजे सल्ला केंद्र असतो का? असा ही प्रश्न विचारला जात आहे.